हैदराबादस्थित ऑल इंडिया मजलिस-ए -इत्तेहदुल मुसलमीन अर्थात एमआयएम पक्षाने राज्यात पदार्पणातच एकूण तीन जागा जिंकत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. १९८४ पासून हैदराबाद लोकसभा मतदारसंघ राखणाऱ्या एमआयएमने भायखळा (मुंबई), मध्य औरंगाबाद आणि पूर्व औरंगाबाद या जागा जिंकत महाराष्ट्रात खाते खोलले.
मुंबईत भायखळा मतदारसंघात व्यवसायाने वकील असणाऱ्या एमआयएमच्या वारिश युसूफ पठाण यांनी आपल्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत भाजपच्या मधुकर चव्हाण यांचा तब्बल २५,३१४ मतांनी पराभव केला. अकबरुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या जोरदार प्रचारामुळे एमआयएमची येथे सरशी झाल्याचे मानले जात आहे. या निकालाविषयी प्रतिक्रिया देताना मधुकर चव्हाण म्हणाले की, भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि अखिल भारतीय सेना या पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मराठी भाषक मतांचे मोठय़ा प्रमाणावर विभाजन झाले आणि एमआयएमला त्याचा फायदा झाला, मात्र एमआयएमच्या धर्मकेंद्रित राजकारणामुळे लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो. मध्य औरंगाबादमध्ये एमआयएमच्या इम्तियाझ जलिक यांनी शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांचा ३० हजार मतांनी दणदणीत पराभव केला, तर पूर्व औरंगाबादमध्ये एमआयएमच्या अब्दुल गफार कादरी यांनी भाजपच्या अतुल मोरे यांचा १५ हजारपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. एमआयएमच्या या विजयांमुळे शिवसेना आणि भाजपच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पडले  आहे.
एमआयएमचा प्रवास
*हैदराबादचे नबाब मीर उस्मान अली खान यांच्या सूचनेवरून नबाब महमूद नवाझ खान किलेदार यांच्याकडून १९२७ मध्ये पक्षाची स्थापना.
*हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन होऊ नये यासाठी दीड लाख रजाकार
*१९४८ मध्ये एमआयएमवर बंदी आणि त्यांचे नेते कासीम रिझवी १९४८ ते १९५७ पर्यंत अटकेत.
*सुटकेनंतर अब्दुल वाहिद ओवैसी यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवून रिझवी यांचे पाकिस्तानात स्थलांतर.
*अब्दुल वाहिद ओवैसी यांच्याकडून पक्षाची पुनर्बाधणी.
*१९६२ मध्ये पाथरघट्टी विधानसभा मतदारसंघात सुलतान सलाहुद्दीन ओवैसी यांच्या विजयाद्वारे एमआयएमचा आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश.
*१९८४ मध्ये हैदराबाद लोकसभा मतदारसंघात सुलतान ओवैसी यांची सरशी.
*यानंतर आजपर्यंत हा मतदारसंघ एमआयएमच्याच ताब्यात.
*एप्रिल २०१४ मध्ये तेलंगणा विधानसभेच्या ९ जागांवर एमआयएमचा विजय.
*एमआयएमला निवडणूक आयोगाची मान्यता.
*२००७ मध्ये बांगलादेशची लेखिका तस्लिमा नसरीन यांच्यावर एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा हैदराबादमध्ये हल्ला.

Story img Loader