शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतही भाजपने पाय रोवले आहेत. मुंबईच्या ३६ मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेनेतच वर्चस्वाची अटीतटीची लढाई रंगली. या लढतीत भाजपने १५ जागांवर तर शिवसेनेने १४ जागांवर विजय मिळविला आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत पराभवाची धूळ चाखावी लागली. राज्याप्रमाणेच मुंबईतही भाजप हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
मराठी मतांचा टक्का हळूहळू कमी होत गेल्याने मुंबईवरील शिवसेनेची पकड ढिली होऊ लागली होती. निवडणुकीच्या राजकारणात गेल्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने बाजी मारली होती, तर शिवसेनेच्या चार व भाजपच्या पाच जागा निवडून आल्या होत्या. या वेळी मात्र शिवसेनेपेक्षा एक जागा अधिक मिळवून भाजपने सेनेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मराठी अस्मितेच्या जोरावर लढविलेल्या या निवडणुकीत मुंबईवर कोणाचे वर्चस्व, हा मुद्दाही शिवसेनेने प्रतिष्ठेचा केला होता.mum01 भाजपने स्वबळावर लढताना मुंबईवरही कमालीचे लक्ष केंद्रित केले. लोकसभेच्या निवडणुकीपाठोपाठ त्याच विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुंबईत तीन सभा घेतल्या. त्यामुळे मुंबईत मुख्य लढत भाजप व शिवसेनेतच झाली. युती तुटल्यावर मराठी-अमराठी किंवा गुजराती असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आला. पण मुंबईत अमराठी किंवा गुजराती समाजाची साथही शिवसेनेला मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे मराठी-अमराठी मतांचे ध्रुवीकरण झाले, तर त्याचा फायदा भाजपला अधिक होईल. भाजपला दोघांचीही मते मिळतील, हे लक्षात आल्यावर शिवसेनेने हा मुद्दा सोडून दिला. युती तोडल्याचे खापर त्यांनी भाजपवर फोडले आणि मराठी अस्मिता व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकारण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे मुंबईत शिवसेना भाजपहून अधिक सरस कामगिरी करील, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली.
तावडे, शेलार विजयी
युती तुटल्यावर विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार अशा काही नेत्यांच्या पराभवासाठी शिवसेना जंग जंग पछाडणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र हे दोघेही नेते चांगल्या मताधिक्याने निवडून आले. भाजपसाठी सुरक्षित असलेल्या बोरिवली मतदारसंघातून तावडे हे ७९ हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. विलेपार्लेतूनही पराग अळवणी यांनी ३२ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला. सरदार तारासिंह, अतुल भातखळकर, प्रकाश मेहता, मंगलप्रभात लोढा, राज पुरोहित, योगेश सागर आदी जागांवर भाजप उमेदवार अपेक्षेनुसार निवडून आले. घाटकोपर (प.)मधून मनसेतून भाजपमध्ये आलेले वादग्रस्त आमदार राम कदम यांनाही विजय मिळाला.
शिवसेनेचीही बाजी
शिवसेनेचे बाळा सावंत, संजय पोतनीस, मंगेश कुडाळदेशकर, प्रकाश सुर्वे, सुनील राऊत, महापौर सुनील प्रभू, रवींद्र वायकर, सदा सरवणकर, तुकाराम काते हे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेनेची कामगिरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत उंचावली असून लोकसभेप्रमाणेच शिवसेनेनेही मुंबईत आपला प्रभाव दाखविला. मात्र शिवसेनेला मुंबईत अपेक्षेइतके यश मिळाले नाही.
एमआयएमचा मुंबईत शिरकाव
एमआयएमचे वारिस पठाण हे भायखळा मतदारसंघातून निवडून आले. शिवसेनेने आपला उमेदवार उभा न करता गीता गवळी यांना पाठिंबा दिला होता. काँग्रेस व भाजपचे मधू चव्हाण या चौघांमध्ये प्रमुख लढत झाली. मराठी मतांचे विभाजन होऊन मुस्लीमबहुल मतदारसंघात वारिस पठाण यांना फायदा झाला.  

Story img Loader