विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या अभूतपूर्व यशाबरोबरच आंध्र प्रदेशातील ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल् मुसलिमीन’ अर्थात ‘एमआयएम’च्या मुसंडीने सारेच चकित झाले आहेत. या पक्षाने दोन जागांवर विजय मिळविला आहे आणि तीन मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. मुस्लिम लीगच्या अस्तानंतर या समाजाने शोधलेला ‘एमआयएम’ हा नवा राजकीय पर्याय आहे, असे मानले जात आहे.
महाराष्ट्रातील मुस्लिम समाज शिवसेना -भाजपला मतदान करत नाही. काँग्रेसने प्रारंभापासूनच मुस्लिम समाजाला आपला निवडणुकीतील आधार म्हणून हाताशी धरले. परंतु तरीही १९७२मध्ये मुंबईत उमरखाडी मतदारसंघातून पहिल्यांदा मुस्लिम लीगच्या माध्यमातून समाजाचा प्रतिनिधी विधानसभेत गेला. मधल्या काळात लीगला फारसे यश मिळाले नाही. १९८५ व १९९०मध्ये याच मतदारसंघातून लीगचे उमेदवार म्हणून बशीर पटेल दोनदा निवडून गेले होते. उमरखाडीबरोबरच चिंचपोकळी, नागपाडा, अंबोली, वांद्रे, कुर्ला, नेहरुनगर, मालेगाव, बाळापूर, अकोला, नांदेड, औरंगाबाद (पश्चिम) या मतदारसंघांमध्ये मुस्लिम लीगला चांगला जनाधार मिळाला होता.   
१९९० नंतर म्हणजे मंडल व बाबरी विध्वंसानंतरचे देशातील राजकारण बदलले. मुस्लिम समाज काँग्रेसपासून दूर गेला व त्यांनी मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाला जवळ केले. मुंबईत १९९५मध्ये मुस्लिम लीग सोडून बशीर पटेल समाजवादी पक्षात दाखल झाले व ते निवडून आले. हळूहळू मुस्लिम लीगची जागा काही ठिकाणी जनता दलाने व समाजवादी पक्षाने घेतली. मालेगावमधून निहाल अहमद तीन वेळा जनता दलाचे आमदार म्हणून निवडून आले. मुंबईत बशीर पटेल यांच्याबरोबर, सोहेल लोखंडवाला व नवाब मलिकही सुरुवातीला सपचे आमदार होते. नंतर तिघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आता समाजवादी पक्षाचे अबु  आझमी हे मानखुर्द-शिवाजीनगर या मुस्लिमबहुल वस्तीमधूनच निवडून आले आहेत.  समाजवादी पक्षाचा प्रभाव कमी होत गेल्याने मुस्लिम समाज राजकीय पर्यायाच्या शोधात होता. आंध्र प्रदेशात जन्माला आलेला ‘एमआयएम’ हा पक्ष त्यांना जवळचा वाटला. या पक्षाने २०१२च्या नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीत १० उमेदवार निवडून आणून महाराष्ट्रात शिरकाव केला. विधानसभा निवडणुकीत पक्षाने २०हून अधिक जागा लढविल्या होत्या. त्यापैकी भायखळा व औरंगाबाद मध्य या दोन जागाजिंकल्या. परभणी, औरंगाबाद (पूर्व) व सोलापूर (मध्य) या तीन मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते त्यांनी घेतली आहेत. विशेष म्हणजे कुर्ला मतदारसंघात अविनाश बर्वे नावाच्या मराठी कार्यकर्त्यांला पक्षाने उमेदवारी दिली होती. त्याला २५ हजार ७४१ मते मिळाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा