नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले तरी ते अजूनही गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखेच वागतात असे सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर चौफेर हल्ला चढवला. भाजप नेते गोपीनाथ मुंडे आज असते तर मला महाराष्ट्रात यावे लागले नसते असे सांगून नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची लायकी काढल्याचा टोला लगावतानाच काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचे आवाहन राज यांनी केले.
महाराष्ट्रात भाजपने स्वबळाची भाषा केली असली तरी त्यांचे बहुतेक उमेदवार हे काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच शिवसेनेतून आयात केलेले उमेदवार असल्याचे मतदारसंघाची यादी वाचून राज यांनी दाखवून दिले. यांच्याकडे कोणतेही बळ नसताना हे स्वबळाची भाषा करत असून महाराष्ट्राती भाजपच्या एकाही होर्डिगवर राज्यातील भाजप नेत्याचे छायाचित्र का नाही, असा सवालही राज यांनी केला.
नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान झाल्यानंतरही केवळ गुजरात एके गुजरात सुरु असून मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे पंतप्रधान आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा छुपा अजंडा कोणता असा प्रश्न मोदी यांच्या अमेरिका भेटीनंतर निर्माण झाला असून तेथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे मोदींचे स्वगत ‘केम छो’ म्हणून कसे करू शकतात असा खडा सवालही राज यांनी केला. व्हाईट हाऊसमध्ये मोदींच्या स्वागतानिमित्त मनोरंजन कार्यक्रमात ‘गरबा’ सादर केला जातो असे सांगून मोदींची ओळख ही भारताचे पंतप्रधान म्हणून असली पाहिजे गुजरातचे पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही राज यांनी यावेळी दिला. भांडुप येथील मनसेचे उमेदवार शिशिर शिंदे यांच्या प्रचारसभेत बोलाताना राज म्हणाले, एकीकडे नरेंद्र मोदी महाराष्ट्र घडविण्याची भाषा करतात आणि त्याचवेळी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन महाराष्ट्रातील उद्योजकांना गुजरातमध्ये येण्याचे आवाहन करतात. हा समाजा समाजात मतभेद करणारा उद्योग असल्याचेही ते म्हणाले.
घाटकोपर मनसेचेच
घाटकोपर हा मनसेचाच बालेकिल्ला असून तो मनसेचाच राहणार असे सांगत राम कदम यांच्यावर ‘हे राम’ म्हणण्याची पाळी येणार असा टोला राज यांनी लगावला.

Story img Loader