गेल्या १५ वर्षांपासून असलेला कॉंग्रेससोबतचा घरोबा तोडून स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुरुवारी जाहीर केला. मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी कॉंग्रेससोबतची आघाडी तोडून इतर समविचारी पक्षांना बरोबर घेऊन स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. राज्यातील सध्याच्या सरकारला असलेला पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्रही आपण राज्यपाल विद्यासागर राव यांना देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादीने आपली ताकद पाहून निम्म्या जागा लढविण्याचा प्रस्ताव कॉंग्रेसपुढे ठेवला होता. मात्र, या प्रस्तावावर कॉंग्रेसकडून कोणताही विचार झाला नाही. त्यांनी आमच्या प्रस्तावावर काहीही उत्तर दिले नाही, असे सांगून पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांत अपक्ष आमदारांनी प्रवेश केला आहे. या अपक्ष आमदारांच्या जागा त्या त्या पक्षासाठी सोडण्यावरही आमची कॉंग्रेससोबत बोलणी झाली होती. मात्र, काल रात्री कॉंग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत नवापूर आणि मालेगाव मध्य या जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार जाहीर केले. आघाडी करण्यासाठी कॉंग्रेसने दिलेला १२४ जागांचा प्रस्ताव आम्ही याआधीच फेटाळला होता. मात्र, त्यानंतर त्यांच्याकडून दुसरा कोणताच प्रस्ताव आला नाही, असे त्यांनी सांगितले.
धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखाली गेली १५ वर्षे सत्तेत आहोत. २००४ मधील निवडणुकीत कॉंग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा कमी जागा मिळाल्या असतानाही आम्ही कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखाली राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर राष्ट्रवादीची ताकद वाढली असतानाही आम्हाला जागा वाढवून देण्याला कॉंग्रेसने पाठिंबा दिला नाही, असे पटेल यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा