युतीमध्ये जागावाटपावरून तणातणी सुरू असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही जागांवरूनच खेचाखेची सुरू आहे. जागावाटपात किती जागा देणार हे काँग्रेसकडून स्पष्ट झाल्यावरच पुढील चर्चा करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. तर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यातील नेत्यांची उद्या बैठक बोलाविली असून, त्यात राष्ट्रवादीला किती जागा सोडता येतील, याचा आढावा घेतला जाईल.
भाजप आणि शिवसेनेत ताणले गेलेले वातावरण काहीसे निवळल्याने आघाडीचे नेते आता पुढील व्यूहरचनेच्या दृष्टीने तयारी करीत आहेत. ‘आम्ही निम्म्या जागा मागितल्या होत्या. त्यावर काँग्रेसने १२४ पेक्षा जास्त जागा देता येणार नाही, असे कळवले होते. त्याला आम्ही नकार दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या परदेशातून परतल्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहे. नक्की किती जागा देणार हे एकदा स्पष्ट झाल्यावरच मग पुढील निर्णय घेतला जाईल,’ असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
परदेशातून परतल्यावर काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी सकाळी राज्यातील राजकीय परिस्थिती आणि उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता बैठक बोलाविली आहे. राष्ट्रवादीला किती जागा सोडता येतील यावर बैठकीत निर्णय घेऊन राष्ट्रवादीला कळवले जाईल. तसेच काँग्रेसची पहिली यादी उद्या किंवा रविवारी जाहीर केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
स्वबळाचे इशारे, बेटकुळय़ा
‘आम्ही काँग्रेसच्या निरोपाची प्रतीक्षा करीत आहोत. गरज भासल्यास सर्व जागा लढविण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू आहे,’ असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी सांगितले. तर स्वबळाच्या बेटकुळ्या फुगविणाऱ्यांनी स्वबळावर लढावे. म्हणजे कोणाच्या बेटकुळ्या इंजेक्शनने फुगल्या हे उघड होईल, असे छगन भुजबळ म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2014 रोजी प्रकाशित
आधी जागांचं बोला, मग आघाडीचं!
युतीमध्ये जागावाटपावरून तणातणी सुरू असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही जागांवरूनच खेचाखेची सुरू आहे. जागावाटपात किती जागा देणार हे काँग्रेसकडून स्पष्ट झाल्यावरच पुढील चर्चा करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे.

First published on: 20-09-2014 at 03:06 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp congress ncp congress alliance seat sharing