राज्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद मिळाल्याने आनंदून गेलेल्या हजारो नागपूरकरांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांचा हृद्य सत्कार केला. सारे नामवंत याला हजर होते. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच तेवढे गैरहजर होते. गडकरींच्या या गैरहजेरीची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर फडणवीस रविवारी प्रथमच शहरात आले. त्यांच्या जंगी सत्काराची तयारी भाजपचे आमदार व इतर पदाघिकाऱ्यांनी दोन दिवस आधीपासूनच चालविली होती. त्यासाठी संपूर्ण शहर सजवण्यात आले होते. प्रचंड गर्दीत निघालेल्या मिरवणुकीनंतर धरमपेठमधील त्यांच्या बंगल्यासमोरच्या त्रिकोणी पार्कमध्ये फडणवीसांचा जाहीर सत्कार झाला. या सत्काराला उत्तर देताना फडणवीस कमालीचे भावूक झाले होते. हजारो नागरिक हा आनंद व अभिमानाचा क्षण डोळ्यात साठवून घेत होते. पक्षाचे सारे नेते व कार्यकर्ते यानिमित्ताने एकत्र आलेले असताना शहराचे खासदार व केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी मात्र गैरहजर होते.
एरवी शनिवार व रविवारी गडकरी नेहमी नागपूरला येतात. सोमवारी दिल्लीला परत जातात. यावेळी मात्र ते आले नाही. त्यांच्या महालातील वाडय़ावर विचारणा केली असता शनिवारी महत्त्वाची बैठक असल्याने व रविवारी उत्तर प्रदेशात एक कार्यक्रम असल्याने ते आले नाहीत, असे सांगण्यात आले.
देवेंद्र आपल्याला लहान भावासारखा आहे, असे सांगणाऱ्या गडकरींनी या कार्यक्रमासाठी वेळ काढून यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया सत्कार कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेकांनी व्यक्त केली.
शनिवार व रविवारी शहरात न येणारे गडकरी मंगळवारी सायंकाळी येथे येणार आहेत, तर मुख्यमंत्री फडणवीस याच दिवशी सकाळी मुंबईला जाणार आहेत. फडणवीस शहरात असेपर्यंत यायचे नाही, हा योगायोग समजायचा काय, असा प्रश्नही आता पक्षाच्या वर्तुळात उपस्थित होत आहे. स्वत: फडणवीस यांनीही भाषणातून गडकरींविषयी आदरभाव व्यक्त केला, तरीही गडकरींच्या गैरहजेरीची चर्चा
रंगलीच.
पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे गडकरी येऊ शकले नाहीत. या गैरहजेरीचा भलताच अर्थ काढू नका.
कृष्णा खोपडे, भाजप शहराध्यक्ष