मतांवर लक्ष ठेवून आघाडी सरकारने घाईघाईत मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, पण या निर्णयाचा वेगवेगळे लढलेल्या काँग्रेस वा राष्ट्रवादीला निवडणुकीत फार काही राजकीय लाभ झालेला नाही. मराठा आरक्षणामुळे अन्य समाजांमध्ये त्याची उलटीच प्रतिक्रिया उमटली आणि ही मते भाजपच्या परडय़ात पडली.
लोकसभा निवडणुकीत पार सफाया झाल्यावर राष्ट्रवादीने आपली हक्काची मराठा मतपेढी घट्ट राहावी या उद्देशाने मराठा आरक्षणाचा पुरस्कार केला. सुमारे ३० ते ३२ टक्के मराठा मते निर्णायक असल्याने मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या सत्तेच्या नाडय़ा हातात असलेल्या मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात आल्याने इतर मागासवर्गीय तसेच दुर्बल घटकांमध्ये त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली. मतदानात त्याची प्रतिक्रिया उमटल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक १९ जागा मिळाल्या. यावरून मराठा समाजाची मतेही भाजपला मिळाल्याचे स्पष्ट होते. मराठा आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला तरी निवडणुकीत त्याचा राजकीय लाभ झाला नाही, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी दिली. मुस्लिमांची पारंपरिक मते यंदा विरोधात गेल्याने काही ठिकाणी नुकसान झाल्याची भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली. मुस्लिम समाज का विरोधात गेला याचे पक्षाला आत्मचिंतन करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निर्णयामुळे इतर मागासवर्गीयांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल नाराजीची भावना होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी इतर मागासवर्गीयांच्या मतांसाठी भाजपने मोदी यांचे कार्ड वापरले होते. त्याचा भाजपला देशभर फायदा झाला होता. हाच प्रयोग राज्यातही यशस्वी झाला.
धनगर आरक्षणावरील  टोलवाटोलवी काँग्रेस व राष्ट्रवादीला भोवली. धनगर समाज दोन्ही काँग्रेसच्या विरोधात गेला. त्याचा बऱ्याच प्रमाणात लाभ भाजप व शिवसेनेला झाल्याचा दावा धनगर आरक्षण संघर्ष समितीचे समन्वयक नवनाथ पडळकर यांनी केला आहे.