विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपने जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक म्हणजे १४ जागांवर विजय संपादीत केला. शिवसेना व काँग्रेसने प्रत्येकी सात तर राष्ट्रवादीने पाच जागांवर विजय मिळविला. मनसेचा नाशिकमधील बालेकिल्ला पुरता उध्वस्त झाला. एकही जागा त्यांना राखता आली नाही. माकपने एक, तर अपक्षांनी एक जागा मिळविली. १७ विद्यमान आमदारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला. माजीमंत्री ए. टी. पवार, पद्माकर वळवी, गुलाबराव देवकर यांच्यासह सुरेश जैन, वसंत गिते हे दिग्गज नेते पराभूत झाले.
मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास भाजपला १० जागांचा फायदा झाला आहे. गतवेळी त्यांचे संख्याबळ केवळ चार होते. युती तुटूनही शिवसेनेने आपले सातचे संख्याबळ कायम राखण्यात यश मिळवले. राष्ट्रवादीचे चार जागांचे नुकसान झाले. विरोधी वातावरणात काँग्रेसला एका जागेचा लाभ झाला. मनसेचे पानिपत झाले असून, त्यांचे नाशिकमधील अस्तित्व संपुष्टात आले आहे. ऐनवेळी हाती लागलेल्या प्रबळ उमेदवारांना घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपसह सर्वपक्षीयांना काही जागांवर आयात उमेदवारांचा लाभ झाला, तर काही जागांवर मात्र नुकसान सहन करावे लागले. नाशिक जिल्ह्य़ात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीला समान यश मिळाले. या पक्षांनी प्रत्येकी चार जागा मिळवल्या.
जळगाव जिल्ह्य़ात भाजप, शिवसेनेचे वर्चस्व असून, काँग्रेस-राष्ट्रवादीचा सफाया झाला. जिल्’ाातील ११ मतदारसंघांमध्ये भाजपला सहा, शिवसेनेला तीन, राष्ट्रवादी आणि अपक्ष प्रत्येकी एक याप्रमाणे जागा मिळाल्या आहेत. यावेळी सात विद्यमान आमदारांना घरी बसावे लागले आहे. भाजपचे सुरेश भोळे, एकनाथ खडसे, गिरीश महाजन, उन्मेष पाटील, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे तर, शिवसेनेचे गुलाबराव पाटील, चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील हे विजयी झाले. राष्ट्रवादीला एरंडोलमधून डॉ. सतीश पाटील यांच्या रूपाने एकमेव यश मिळाले. अफाट लक्ष्मीदर्शनाच्या चर्चेने गाजलेल्या अमळनेर मतदारसंघात शिरीष चौधरी या अपक्ष उमेदवाराने सर्वच पक्षांना धूळ चारली. तुरुंगातून निवडणूक लढविणारे सुरेश जैन आणि माजीमंत्री गुलाब देवकर यांना पराभूत व्हावे लागले.
धुळे जिल्ह्य़ातील पाचही विधानसभा मतदारसंघांत सर्वाधिक ४२ हजार १५८ एवढे मताधिक्य घेत भाजपचे जयकुमार रावल यांनी शिंदखेडय़ातून सलग तिसऱ्यांदा आमदारकी राखली. त्यांच्यासह अनिल गोटे, काँग्रेसचे काशिराम पावरा हे पुन्हा एकदा विधानसभेत प्रवेश करणारे लोकप्रतिनिधी ठरले. काँग्रेसचे डी. एस. अहिरे आणि कुणाल पाटील हे विजयी झाले.
नंदुरबार जिल्ह्य़ात भाजप व काँग्रेसला समान यश मिळाले तर राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. भाजपचे डॉ. विजयकुमार गावित व उदेसिंग पाडवी तसेच काँग्रेसचे के. सी. पाडवी व माजी मंत्री सुरूपसिंग नाईक हे विजयी झाले. शहाद्यातून पालकमंत्री तथा माजी क्रीडामंत्री पदमाकर वळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. डॉ. गावितांचे धाकटे बंधू असलेल्या शरद गावितांवरच जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीची संपूर्ण भिस्त होती. मात्र त्याच्या पराभवाने राष्ट्रवादीला जिल्ह्य़ात जोरदार हादरा बसला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा