२००९ च्या निवडणुकीत नाशिकमधील तिघा जागांवर विजय मिळविणाऱ्या मनसेला भोपळाही फोडता न येणे..राज्यात राष्ट्रवादीच्या बलाढय़ नेत्यांना पराभव स्वीकारावा लागत असताना भुजबळ पिता-पुत्रांनी काठावर का होईना राखलेले वर्चस्व..  जळगाव पालिका घरकुल घोटाळ्यात कारागृहात राहण्याची नामुष्की आल्यानंतरही उमेदवारी करणारे शिवसेनेचे सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांना मतदारांनी नाकारणे..राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या डाँ. विजयकुमार गावित यांना साथ देतानाच त्यांच्या दोन बंधूंना पराभवाचा धक्का देत घराणेशाहीला नंदुरबारच्या जनतेने दिलेली ठोकर आणि पुन्हा एकदा धुळे जिल्ह्य़ाने काँग्रेसची केलेली सोबत..
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्य़ातील विधानसभा निवडणूक निकालाची ही प्रमुख वैशिष्टय़े. एकूण ३५ पैकी १४ जागांवर विजय मिळविणारा भाजप हा उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक बलाढय़ पक्ष म्हणून उदयास आला असून, शिवसेना आणि काँग्रेसला समान म्हणजे सात तर, राष्ट्रवादीला केवळ पाच जागा मिळाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना उत्तर महाराष्ट्रात मिळालेल्या प्रतिसादावरूनच भाजप किमान २० पेक्षा अधिक जागांवर धडक मारेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु, भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे स्पर्धक असलेल्या एकनाथ खडसे यांच्या जळगाव जिल्ह्य़ातच पक्षाने अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केली. विशेष म्हणजे ज्या एरंडोल येथे मोदींची सभा झाली होती, त्याच ठिकाणी राष्ट्रवादीला जिल्ह्य़ातील एकमेव यश मिळाले. कित्येक वर्षांपासून जळगाव शहरात सुरू असलेली सुरेश जैन यांची ‘दादागिरी’ या निवडणुकीत धुळीस मिळाली. भाजपच्या सुरेश भोळे यांनी जैन यांचा पराभव करत उत्तर महाराष्ट्रातील ‘जायंट किलर’ होण्याचा मान मिळवला. कोटय़वधींच्या पालिका घोटाळ्यात अडकल्यानंतर जैन हे सुमारे अडीच वर्षांपासून तुरूंगातच आहेत. तरीही त्यांना उमेदवारी देण्याचा अट्टाहास शिवसेनेला चांगलाच नडला. तीच गोष्ट राष्ट्रवादीची. जैन यांच्याबरोबर तुरूंगात असलेल्या गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने पायावर धोंडा पाडून घेतला. खडसे आणि गिरीश महाजन या एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या नेत्यांच्या अंतर्गत संघर्षांमुळेही भाजपला जिल्ह्य़ातील किमान दोन जागा गमवाव्या लागल्या.
भाजपच्या जागा वाढण्यात नाशिक शहराने दिलेली साथ महत्वपूर्ण ठरली आहे. गेल्या निवडणुकीत मनसेला शहरातील तिघा जागांंचे दान टाकणाऱ्या नाशिककरांना मनसेने पाच वर्षांंत काहीच दिले नाही. विशेष म्हणजे महापालिकाही ताब्यात असणाऱ्या मनसेची सर्वच स्तरातील कामगिरी विलक्षण दयनीय असल्याने त्यांच्याऐवजी भाजपच्या तिघा उमेदवारांना निवडून देत मनसेला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला असेच म्हणावे लागेल. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचारात शहराच्या तीन कोपऱ्यात तीन सभा घेतल्या. परंतु त्यांच्या नेहमीच्या आश्वासनांना कंटाळलेल्या नाशिककरांनी मनसेला साफ धुडकावून लावल्याचे निकालावरून दिसत आहे. नाशिक जिल्ह्य़ात नाशिक पूर्व, नांदगाव, नाशिक पश्चिम या तीन ठिकाणी वादग्रस्त उमेदवार दिल्याचा फटका शिवसेनेला बसला. या तीन मतदारसंघांत शिवसेनेची स्थिती चांगली असतानाही केवळ उमेदवार योग्य नसल्याने सेनेची मते भाजपकडे वळल्याचे दिसते. मोदी यांची भर पावसात नाशिक येथे झालेली सभा भाजपसाठी मदतकारक ठरली. तर, दुसरीकडे कांदा आणि डाळिंब या पिकांचे घसरलेले दर राष्ट्रवादीचे बलाढय़ नेते छगन भुजबळ, नांदगावमध्ये पंकज भुजबळ, निफाडमध्ये अनिल कदम यांच्या विजयास हातभार लावून गेले.
डॉ. विजयकुमार गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा फायदा संपूर्ण नंदुरबार जिल्ह्य़ात होईल, हा भाजप नेत्यांचा भ्रमाचा भोपळा निवडणुकीत फुटला. तसेच वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून गावित कुटुंबियांचे जाळे नंदुरबार जिल्ह्य़ावर पसरविण्याचा बेतही फसला. राष्ट्रवादीकडून उभे राहिलेले डॉक्टरांचे दोन्ही बंधू या निवडणुकीत पराभूत झाले. घराणेशाहीला देण्यात आलेली ही चपराकच म्हणावी लागेल. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला हादरा देणाऱ्या धुळे जिल्’ााने यावेळी पाचपैकी तीन जागांवर स्थान देत चांगलाच हात दिला. एकूणच या निवडणुकीने उत्तर महाराष्ट्रात सर्वच पक्षांच्या वाटय़ाला काही ना काही देताना बऱ्यापैकी धडाही शिकविला असेच म्हणता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा