लाल दिव्याची गाडी वापरण्याबाबत टीका सुरू झाल्यावरही महापौर स्नेहल आंबेकर यांनी लाल दिव्याचा आग्रह कायम ठेवला आहे. मात्र महापौरांनी लाल दिवा कायम ठेवून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यास त्यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे.
महापौरांच्या गाडीवरील लाल दिवा काढून पिवळा दिवा लावण्याचे परिपत्रक राज्य शासनाकडून आल्यावरही माजी महापौर सुनील प्रभू यांनी गाडीवरील दिवा काढला नव्हता. नवनिर्वाचित महापौरांनीही कामापेक्षा आब राखण्याला प्राधान्य देत दिवा काढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी महापौरांवर टीकेची झोड उठवली आहे.
न्यायालयाकडून निर्णय येऊनही महापौर स्वत:च्या गाडीवरील लाल दिवा काढायला तयार नाहीत. शहरातील कोटय़वधी जनतेसाठी काम केल्यावर महापौरांची प्रतिमा उजळून निघेल, त्याऐवजी लाल दिव्याचा अट्टहास का सुरू आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी लगावला. महापौरांचा आग्रह हा न्यायालयाचा अवमान करणारा आहे. त्यामुळे महापौरांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करू, असे त्यांनी स्पष्ट केले.  मुंबईतील सव्वा कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या महापौरांचे पद हे राज्यमंत्र्यांच्या तोडीचे आहे. त्यामुळे गाडीवरील लाल दिवा कायम ठेवणार, अशी ताठर भूमिका सुरुवातीला घेतलेल्या महापौरांनी त्यानंतर मात्र गटनेते तसेच वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी सारवासारव केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा