‘राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची मी दावेदार नाही,’ असे सांगता सांगता ‘राज्यात महिला मुख्यमंत्री झालेली मला आवडेल’, अशी ‘आपली आवड’ जाहीर करून भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी गुरुवारी आपल्या संघर्ष यात्रेचे ‘सांगतास्थळ’च स्पष्ट केले. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे सुरू करण्यात आलेल्या संघर्ष यात्रेनिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. त्याचबरोबर ‘पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास ही जबाबदारीही आपण समर्थपणे पार पाडू,’ असे सांगून त्यांनी आपली राजकीय महत्त्वाकांक्षा जाहीर केली. आमदार गिरीश बापट, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
पंकजा यांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा उद्या, शुक्रवारपासून चाळीसगाव येथून सुरू होत असून पक्षाचे नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे त्या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde likes woman chief minister for maharashtra