काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-भाजप यांच्या विरोधातील मतांचे विभाजन टाळण्यासाठी माकप, शेकाप, भाकप, जनता दल यांच्या डाव्या लोकशाही समितीशी समझोता करण्यात आला आहे, अशी माहिती भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. भारिपप्रणित महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या ४२ उमेदवारांची पहिली यादी त्यांनी जाहीर केली. इतर समविचारी पक्षांशी युती करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आघाडी आणि महायुतीचा सामना करण्यासाठी तिसऱ्या राजकीय पर्यायाच्या नावाने अनेक आघाडय़ा स्थापन झाल्या आहेत. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान मोर्चा व  डॉ. राजेंद्र गवई यांच्या पुढाकाराने महाशक्ती नावाने आणखी एक आघाडी उदयास आली आहे. तर शेकाप, माकप, भाकप, जनता दल यांनी महाराष्ट्र डावी लोकशाही समिती स्थापन केली आहे.
प्रस्थापित पक्षांच्या विरोधात एकच महाआघाडी उभी करावी, त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. डाव्या समितीने प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर तसा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार आंबेडकर यांनी शेकाप, भाकप व माकप लढवित असलेल्या २० जागांवर त्यांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर भारिप आघाडीच्या ४२ उमेदवारांची पहिली यादी त्यांनी जाहीर केली. त्यात हरिदास भदे व बळीराम शिरस्कर या भारिपच्या विद्यमान आमदारांचा समावेश आहे. या वेळी आमदार कपील पाटील, विजय कुलकर्णी, मिलींद रानडे, देवेंद्र गुजर व शब्बीर अन्सारी हे आघाडीचे नेते उपस्थित होते.

Story img Loader