छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक, इंदु मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, ट्रान्स हार्बर लिंक रोड, कोळीवाडयांचा विकास, मेट्रो कारशेड, झुडपी जंगल अशा महत्वाच्या मात्र पर्यावरण विभागाच्या मान्यतेअभावी रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात नव्या मुख्यमंत्र्यांचीही केंद्राने जुन्याच आश्वासनांवर बोळवण केली. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रकाश जावडेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीनंतरही राज्याला केवळ दिल्लीतील बैठकीच्या आश्वासनापलिकडे फारसे काही मिळाले नाही.
प्रकाश जावडेकर हे महाराष्ट्रातीलच असल्याने, केंद्रीय पर्यावरण खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) म्हणून कार्यभार स्विकारल्यानंतर पर्यावरण विभागाच्या मान्यतेअभावी रखडलेले प्रकल्प ते प्राधान्याने मार्गी लावतील अशा अपेक्षेने जून महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण मंत्र्यांसमोर राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे स्मारक तसेच शिवडी-न्हावासेवा ट्रान्स हार्बर लिंक रोड, चारकोप येथील मेट्रो कारशेड, सीआरझेड तीनमध्ये येणाऱ्या कोळी वाडय़ांच्या विकास आदी महत्वाच्या रखडलेल्या प्रकल्पाकडे पर्यावरण मंत्र्याचे लक्ष्य वेधले होते. तेव्हाही, या सर्व प्रकल्पांना लवकरच मान्यता देण्याचे आश्वासन जावडेकर यांनी दिले होते. मात्र गेल्या सहा महिन्यात एकाही प्रकल्पातील अडथळा दूर झालेला नाही.
 राज्यात सत्तांतर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पर्यावरणमंत्र्यांसमवेत रखडलेल्या प्रकल्पांबाबत चर्चा केली. हे सर्व प्रश्न मार्गी कालबद्धरीत्या मार्गी लावण्याचे आश्वासनच नवीन मुख्यमंत्र्यानाही मिळाले. पर्यावरण मंजुरीअभावी मुंबई व राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढील १५ दिवसांत नवी दिल्लीत संबंधितांची बैठकही घेतली जाणार आहे. चव्हाण यांनाही दिल्लीतील बैठकीत हे प्रकल्प मार्गी लावण्याचे अश्वासन मिळाले होते. आज फडणवीस यांनाही मुंबईतील बैठकीत तसेच आश्वासन देण्यात आले.
शिवरायांच्या स्मारकासाठी गिरगाव चौपाटीपासून तीन किमीवर समुद्रात १६ हेक्टरची जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याला मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरु आहे. दादर चैत्यभूमीच्या सुशोभिकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे आणि दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याचे काम सीआरझेडमुळे थांबले आहे. ते लवकरात लवकर व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

Story img Loader