विधानसभा निवडणुकीचे कवित्व संपत नाही तोच ठाण्यातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचे फटाके फुटू लागले असून महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही माझ्या मतदारसंघातील कामे झालीच नाहीत, असा घरचा आहेर देतानाच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी स्थायी समितीत ठराव आणण्यापूर्वी कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार केला जातो, असा खळबळजनक आरोप शुक्रवारी राज्याचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांना पाठविलेल्या पत्रात केला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थायी समिती सभेत आयत्या वेळचे विषय आणून शेकडो कोटी रुपयांच्या कामांना हिरवा कंदील दाखविण्यात आला. या कामांची कंत्राटे विषयपत्रिकेवर मंजुरीसाठी आणण्यापूर्वी ठेकेदाराकडून टक्केवारी घेण्यात आली, असा आरोप सरनाईक यांनी केला आहे.  
ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या मदतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची निवड करण्यात आली. सुधाकर चव्हाण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सरनाईक यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. त्यामुळे सरनाईक यांनी केलेल्या आरोपांविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात असले तरी महापालिकेतील शिवसेनेचे पदाधिकारी अडचणीत सापडले आहेत.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर स्थायी समितीने ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची कंत्राटे मंजूर केली. कळवा खाडीवर उड्डाणपूल उभारण्यासारखे १९० कोटी रुपयांचे कंत्राट आयत्या वेळचा विषय म्हणून मंजुरीसाठी आणण्यात आले. महापालिका प्रशासनाने अशा स्वरूपाची अनेक महत्त्वाची कामे आयत्या वेळचे विषय म्हणून मंजुरीसाठी आणल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. या सगळ्या प्रक्रियेविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित होत असतानाही इतके दिवस मौन धारण करणारे शिवसेनेचे माजी आमदार प्रताप सरनाईक यांनी मतदानाला २४ तास उलटत नाही तोच भ्रष्टाचाराचे आरोप सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
यासंबंधी स्थायी समिती सभापती सुधाकर चव्हाण यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा