देशात त्वरित परिवर्तन घडविण्यासाठी काही मोदींकडे जादूची काठी नसल्याचे वक्तव्य करून केंद्र सरकारचा पाठराखण करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(आरएसएस) मात्र, आपल्या काठीने समाजात फूट पाडण्याचे काम करत असल्याची टीका विद्यमान गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केली. ते तासगांव-कवठेमहाकाळ मतदार संघातील जाखापूर गावात प्रचारसभेत बोलत होते.
मोदी सरकारला सहा महिने झाले असून देखील देशाचा कृषीमंत्री कोण आहे हे देखील जनतेला माहित नाही असेही आर.आर.पाटील म्हणाले. नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल इतकीच आत्मियता वाटत असेल तर, नथ्थूराम गोडसे याचा मोदींनी जाहीर निषेध करून दाखवावा असे आव्हान देखील आर.आर.पाटील यांनी यावेळी केले.
विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्रपूजन करुन शुक्रवारी आरएसएसचे पथसंचलन झाले त्यावेळी स्वयंसेवकांना संबोधित करताना सरसंघचालकांनी मोदी सरकारचे तोंडभरून कौतुक केले होते. मोदी सरकारला केवळ सहा महिने झाले आहेत. त्वरित परिवर्तन घडवून आणण्यासाठी मोदींच्या हातात काही जादूची कांडी नाही असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले होते. यावर निशाणा साधत आर.आर.पाटील यांनी मोदींच्या हातात जादूची काठी नसली तरी, संघ आपल्या हातातील काठीने दमदाटी करून समाजात फूट पाडत आहे अशा शेलक्या शब्दात टीका करत मोहन भागवतांच्या भाषणाचा समाचार घेतला.

Story img Loader