संपूर्ण प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच टीकेचे लक्ष्य बनवणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी, प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही मोदींवर टीका करण्याची संधी सोडली नाही. मोदी पंतप्रधान झाले असले तरी त्यांचे सर्व लक्ष गुजरातकडेच असल्याची टीका राज यांनी केली.
येथील एका पत्रकार परिषदेत राज यांनी मोदींवर टीका केली. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे देशाची शेवटची आशा असून पंतप्रधान बनल्यानंतर आजही त्यांचे गुजरातप्रेम शोभादायक नसल्याचे राज म्हणाले. महाराष्ट्रातील केंद्राचे प्रकल्प गुजरातकडे वळवणे, त्यांनीच बसविलेल्या गुजरातच्या मुख्यमंत्री मुंबईत येऊन महाराष्ट्रावर टीका करून उद्योगपतींना गुजरातला येण्याचे आवाहन करत असतील तर महाराष्ट्र तोडणार नाही, या मोदींच्या घोषणेवर विश्वास ठेवणे कठीण बनते असेही राज यांनी सांगितले. सीमेवर पाकिस्तान सतत्याने हल्ले करत आहे. आपले जवान काँग्रेसच्या काळातही शहीद होत होतो व आजही होत असून त्यांचे मृतदेह शवपेटय़ांमधून आणले जात असताना नरेंद्र मोदी केवळ महाराष्ट्रातील प्रचारात गुंतून पडले आहेत. मोदी महाराष्ट्र अखंड ठेवण्याची ग्वाही देतात तर त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस विदर्भ स्वतंत्र करण्याची घोषणा करतात. राष्ट्रय स्वयंसेवक संघाचा तर छोटी राज्ये हा अजंडाच असून विश्वास कोणावर ठेवायचा हा प्रश्न आहे.
गेल्या पंधरा वर्षांत महाराष्ट्रात टक्केवारीचे राजकारण वाढल्यामुळे उद्योगधंदे अन्य राज्यात जाऊ लागले असून मनसेच्या हातात सत्ता मिळाल्यास राज्याच्या विकासाचे चित्र बदलून दाखवेन असेही राज म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीप्रमाणेच सेना-भाजपही एकमेकांचे कपडे फाडण्याचे काम करत असून भाजपच्या जाहिराती पाहिल्यानंतर ‘कोठे नेऊन ठेवल्या त्या जाहिराती’ असे म्हणावेसे वाटते. वेगळ्या विदर्भाला आपला ठाम विरोध असून गोहत्या बंदी लागू झालीच पाहिजे अशी भूमिकाही राज यांनी मांडली.

Story img Loader