लोकसभा निवडणुकींनंतर विधानसभा निवडणुकीतही पानिपत झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नवसंजीवनी देण्यासाठी आता पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांचा राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते संघटनात्मक बांधणीवर भर देणार आहेत. विधानसभा निवडणुकीत याच संघटनात्मक बांधणीच्या अभावी मनसेच्या आमदारांची संख्या बारावरून एकावर आली आणि पक्षासह पक्षप्रमुखही तोंडावर आपटले.
विधानसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून फुगवलेला महाराष्ट्राच्या विकासाचा फुगा मतदारांनी मनसेला सपशेल झिडकारून फोडला. त्यानंतर मरगळ आलेल्या पक्षनेतृत्त्वावर विश्वास दाखवण्यासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘कृष्णभूवन’ येथे येणार असल्याची चर्चाही होती. त्या पाश्र्वभूमीवर राज ठाकरे आता ३, ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, मनसेच्या सपशेल पराभवानंतर मनसेमधील नाराज माजी आमदार प्रवीण दरेकर पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी दरेकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतली. दरेकर यांच्या नाराजीबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे या भेटीकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा