भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी १३५ जागा लढवाव्यात असा प्रस्ताव आम्ही ठेवला आहे, असे सांगतानाच महायुतीतील इतर सर्व पक्षांना मिळून १८ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे संकेत भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले. त्यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही औपचारिक चर्चा झाली नसून निवडणुकीनंतरच निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
यावेळी महायुतीत कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे सांगून रुडी म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे गेल्या विधानसभेचा जागावाटपाचा फॉम्र्युला बदलून भाजप आणि शिवसेनेने समान जागा लढवाव्यात असा प्रस्ताव आम्ही पाठवला आहे. दोन्ही पक्ष १३५ जागा लढवतील अशी अपेक्षा आहे. महायुतीतील इतर घटक पक्षांचाही आम्ही पूर्ण आदर करतो. त्यांनाही समाधानकारक जागा दिल्या जातील.’ राज्यात शिवसेना मोठा भाऊ असल्याच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यांबाबत विचारले असता रुडी म्हणाले, ‘छोटा भाऊ, मोठा भाऊ असे काहीही नाही. देशातील आणि राज्यातील परिस्थितीही काळानुरूप बदलत गेली आहे. दोन्ही पक्ष समान आहेत.’ राज्यात नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठे आकर्षण आहे, हे कुणीच नाकारू नये,’ असा टोलाही रुडी यांनी शिवसेनेला लगावला.
मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही औपचारिक चर्चा झाली नसल्याचेही रुडी यांनी सांगितले, ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी चांगल्याप्रकारे पक्ष सांभाळला आहे. सर्वाना विश्वासात घेऊनच निवडणुकांनंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल. सध्या मुख्यमंत्रिपदाबाबत काही वक्तव्ये होत असतील, तर ती व्यक्तिगत पातळीवरील आहेत.’ उमेदवारांची अंतिम यादी नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी २५ सप्टेंबरपूर्वी जाहीर केली जाईल, असेही रुडी यांनी सांगितले. यावेळी खासदार अनिल शिरोळे, आमदार गिरीष बापट, भाजपचे महाराष्ट्र प्रचार प्रमुख श्रीकांत भारती, प्रदेश सरचिटणीस मेधा कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.
जाहीरनामा सप्टेंबर अखेर
सप्टेंबर अखेपर्यंत भाजपच्या जाहिरनाम्याचे प्रकाशन होणार असल्याचे रुडी यांनी सांगितले. जिल्हा स्तरावर प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधून त्यांच्या गरजा जाणून घेऊन त्याचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात येणार आहे. त्याबाबत सध्या काम सुरू असल्याचे रुडी यांनी सांगितले.
भाजप आणि सेनेसाठी प्रत्येकी १३५ जागांचा प्रस्ताव – रूडी
भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी १३५ जागा लढवाव्यात असा प्रस्ताव आम्ही ठेवला आहे, असे सांगतानाच महायुतीतील इतर सर्व पक्षांना मिळून १८ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे संकेत भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-09-2014 at 02:35 IST
TOPICSराजीव प्रताप रुडी
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajiv pratap rudy say bjp shiv sena seat sharing on 135 seats for each