राज्यात भाजपला यश मिळण्यात मोदी यांच्याबरोबरच रिपब्लिकन पक्षाची मतेही निर्णायक होती हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे, असे सांगत आपल्याला मंत्रिपद देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिलेला शब्द पाळून रविवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात गोरगरिबांच्या सेवेसाठी आपला समावेश केला जावा, अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शुक्रवारी मांडली.
आपण सत्तेच्या मागे नाही, पण दिलेला शब्द पाळला जावा ही आपली माफक अपेक्षा असल्याचे आठवले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शिवसेनेबरोबर युती तुटल्यावर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तेव्हा अमित शहा यांनी आपल्याला केंद्रात मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. तर एनडीएचे सरकार सत्तेत आले तेव्हा मोदी यांनी आपल्याला विस्ताराच्या वेळी मंत्रिमंडळात समावेश करण्याचे आश्वासन दिले होते. या दोघांनी दिलेले आश्वासन पाळावे, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सफाया झाला त्यात रिपब्लिकन मतेही निर्णायक ठरली. रिपब्लिकन पक्षाला केंद्र आणि राज्याच्या सत्तेत वाटा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यानुसारच सत्तेत वाटा मागत आहोत व त्यात चूक काहीही नाही, असेही आठवले यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा