राज्यातील शिवसेना-भाजप युती तुटल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर घटकपक्षांना आपल्याकडे वळवण्यासाठी सेना-भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला. तर भाजपाने आठवले यांना केंद्र सरकारमध्ये अनंत गीते यांच्या जागेवर कॅबिनेट मंत्रीपद देऊ केले आहे. आता सेनेसोबत जायचे की भाजपचा हात धरायचा याचा निर्णय शुक्रवारी करणार असल्याचे रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे.
महायुती तुटल्याची घोषणा गुरुवारी सायंकाळी होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आठवले यांना ‘मातोश्री’वर येण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार दोघांची बैठक झाली. त्यात बाळासाहेबांच्या इच्छेनुसार ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ एकत्र याव्यात म्हणून सेना-रिपाइं युती झाली. आता भाजपसोबतची युती तुटली असली तरी विधानसभा आपण एकत्रितपणे लढवू आणि राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीची सत्ता आणू. तुम्ही उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्या.’, असा प्रस्ताव उद्धव यांनी मांडला. तर त्या आधीच भाजपच्या बडय़ा नेत्याने आठवले यांच्यासोबत बुधवारी दिल्लीवारी केली होती. युती तुटल्यानंतर शिवसेनेचे अनंत गीते यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागेल. भाजपच्या जागेवरून तुम्हाला खासदार करण्यात आले आहे. आता गीते यांच्या जागेवर केंद्रात मंत्रीपद घ्या आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करा, असा प्रस्ताव भाजपतर्फे आठवले यांना देण्यात आला.
उद्धव ठाकरे यांनी राज्यात उपमुख्यमंत्री होण्याचा प्रस्ताव दिला आहे. भाजपनेही प्रस्ताव दिला आहे. आता याबाबत अंतिम निर्णय शुक्रवारी घेण्यात येईल, असे रामदास आठवले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना भाजपने केंद्रात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर महादेव जानकर यांना भाजपने केंद्रात खासदारकी किंवा राज्यात कॅबिनेटमंत्रीपद देऊ केले आहे. तसेच विनायक मेटे यांनाही राज्यात मंत्रिपदाचा प्रस्ताव देऊन आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे.

Story img Loader