विधानसभा निवडणुकीत जागावाटपाच्या मुद्दय़ावरून महायुती विस्कटली आणि शिवसेना की भाजप या प्रश्नावर रिपब्लिकन पक्षाचेही तुकडे झाले. रामदास आठवले यांनी भाजपबरोबर राहणे पसंत केले, तर त्यांच्याच पक्षातील एक ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे शिवसेनेला जाऊन मिळाले. पक्षातील फुटीबद्दल दोन्ही नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेतून रिपब्लिकन राजकारणाच्या केविलवाण्या अवस्थेला सत्तेची महत्त्वाकांक्षा कशी कारणीभूत ठरले, हे लपून राहिलेले नाही.
शिवसेनेबरोबरच्या समझोत्यातून शिवशक्ती-भीमशक्ती युतीची संकल्पना पुढे आली. परंतु महायुतीत फूट पडल्यानंतर शिवसेनेऐवजी भाजपला साथ देण्याचा का निर्णय घेतला? शिवशक्तीला सोडचिठ्ठी दिला का?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी २५ जानेवारी २०११ ला त्यांना भेटलो. त्यावेळी त्यांनीच शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली पाहिजे, या दोन शक्ती एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर मी राज्यभर सात-आठ महिने फिरलो. पक्षाचे कार्यकर्ते, विचारवंत, साहित्यिक, युवक, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. सर्वाचे मत एक झाले की शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र झाली पाहिजे. त्यानुसार मी शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीचा निर्णय घेतला. परंतु शिवशक्ती म्हणजे फक्त शिवसेना नव्हे, त्यात भाजपही आहे. शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून जो वाद पेटला. त्यात माझी भूमिका सामंजस्याची होती. मी दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत होतो, आम्ही त्यांना एक सूत्र देऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या भूमिकेवर अडून बसले होते. स्वबळावर लढण्याची दोघांनाही खुमखमी होती. अखेर युती तुटली. त्यानंतर मी उद्धवजींना भेटलो. त्यांनी सोबत येण्याची विनंती केली. सत्ता आल्यावर उपमुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले. दुसऱ्या बाजूला भाजपच्या नेत्यांनी केंद्रात मला मंत्रिपद, राज्यात सत्ता आल्यानंतर दोन-तीन मंत्रिपदे, दोन-तीन एमएलसी, महामंडळे, समित्या यांवर कार्यकर्त्यांच्या नेमणुका करू अशी आश्वासने दिली. त्यामुळे मी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.
भाजपबरोबर जाण्याच्या तुमच्या निर्णयाला विरोध करून अर्जुन डांगळे यांनी शिवसेनेला समर्थन दिले. काकासाहेब खंबाळकर यांनीही पक्ष सोडला. भाजपबरोबर जाण्याचा निर्णय सर्वाना मान्य नव्हता, तो एकतर्फी होता, असा त्याचा अर्थ नाही का?
 अर्जुन डांगळे पक्षातील ज्येष्ठ नेते, विचारवंत आहेत. मी त्यांचा नेहमीच सन्मान करीत आलो आहे. परंतु शिवसेनेबरोबर जायचे की भाजपबरोबर जायचे असा आमच्यासमोर पेच निर्माण झाला, त्यावेळी पक्षातील सर्वच नेत्यांशी चर्चा केली. मी शिवसेना व भाजप सोडून तिसऱ्या पर्यायाचा विचार करा असेही सांगितले होते. मात्र भाजपकडून आलेल्या प्रस्तावाला सर्वानीच होकार दिला. भाजपबरोबर जावे, असा सल्ला खुद्द डांगळे यांनी मला दिला होता. इतकेच नव्हे तर, सत्तेत सहभाग हवा असेल तर भाजपबरोबरच जायला हवे असा त्यांचा आग्रह होता. भाजपबरोबर जाण्याचा निर्णय सर्वाचा आहे, माझा एकटय़ाचा नाही.
आपण सांगता ती वस्तुस्थिती असेल तर मग डांगळे शिवसेनेसोबत का गेले?
भाजपबरोबर रिपब्लिकन पक्षाने युती केल्याचे शिवसेनेला आवडले नाही. त्यामुळे त्यांनी डांगळे यांना हाताशी धरून रिपब्लिकन पक्षात जाणीवपूर्वक फूट पाडली. डांगळे यांना काही तरी आश्वासन दिले असेल. त्यांनी अशी खेळी करायला नको होती. डांगळे हे रिपब्लिकन फुटीचे शिल्पकार ठरले आहेत.  
रामदास आठवले यांनी आंबेडकरी जनतेला दगा दिला असा शिवसेनेने आरोप केला आहे
शिवसेना अडचणीत आली आहे, त्यामुळे त्यांना भीमशक्तीची आठवण होत आहे. परंतु त्यांनी त्यांच्या कोटय़ातून मला राज्यसभेची खासदारकी का दिली नाही, केंद्रात मंत्रिपदासाठी शिफारस का केली नाही, विधानसभेवर कायम भगवा फडकवण्याची भाषा केली जाते, भगव्याबरोबर निळा झेंडा फडकावण्याबद्दल सेना नेते का बोलत नाहीत, असा माझा त्यांना सवाल आहे. होय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला केंद्रात मंत्री करण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्रात सत्ता स्थापनेत आमचाही वाटा आहे, म्हणून मंत्रिपद हवे आहे. मी मंत्रिपदाच्या मागे लागलो आहे, हा प्रचार खोटा आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा