शिवसेनेशी केलेल्या मैत्रीमुळे महायुतीत आलेल्या रामदास आठवले यांनी महायुती तुटल्यानंतर अखेर दोन दिवसांनी भाजपसोबत युती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद आणि राज्यात सत्ता आल्यावर चार मंत्रीपदांसह रिपब्लिकन पक्षाला सत्तेत दहा टक्के वाटा मिळण्याचे आश्वासन भाजपकडून मिळाल्यानंतर अखेर भाजपला साथ देणार असल्याचे शनिवारी आठवले यांनी जाहीर केले.
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर बाकीचे छोटे पक्ष भाजपसोबत राहिले. शिवसेनेने राज्यात सत्ता आल्यावर उपमुख्यमंत्रीपद आणि सत्तेत वाटा देण्याचे आश्वासन दिल्याने रामदास आठवले यांची मनस्थिती काहीशी द्विधा झाली होती. निर्णय होत नव्हता. अखेर दोन दिवस शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांशी वाटाघाटी केल्यानंतर आठवले यांनी भाजपसह युती करण्याचा निर्णय जाहीर केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि आठवले यांच्यात शनिवारी सकाळी चर्चा झाली. त्यात आठवले यांनी आपल्या मागण्या मांडल्या. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत आल्यावर फडणवीस यांनी आठवले यांच्यासह झालेल्या चर्चेचा तपशील शहा यांना सांगितला. शहा यांनी मंजुरी दिल्यानंतर आठवले यांना केंद्रात मंत्रिपद, केंद्र सरकारच्या आयोग-मंडळांवर रिपब्लिकन कार्यकर्त्यांची नियुक्ती, राज्यात सत्ता आल्यावर चार मंत्रिपदे, दोन विधान परिषदेच्या जागा आणि सत्तेत दहा टक्के वाटा मिळेल, असे फडणवीस यांनी आठवले यांना कळवले. आठवले यांनी त्यास होकार देत विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्ष भाजपसह युती करणार असल्याचे जाहीर केले. रिपाइं या निवडणुकीत आठ जागा लढवणार आहे.रिपाइंचे आपले आठ उमेदवार जाहीर केले. त्यात दीपक निकाळजे (चेंबूर) विवेक पंडित (विक्रोळी) चंद्रकांता सोनकांबळे (पिंपरी), नवनाथ कांबळे (पुणे) कुंदन गोटे (मुंब्रा) अनिल गांगुर्डे (भांडुप) प्रकाश लोंढे (देवळाली) राम तायडे (अंबरनाथ) यांचा समावेश आहे.
रिपब्लिकन पक्षाची युती शिवसेनेसह झाली होती. पालिकेत सत्ता आल्यावर सेनेने रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा दिला नाही. तसेच आठवले यांना खासदारकी देण्याऐवजी टोलवाटोलवी केली. त्यावेळी भाजपने आपल्या जागेवरून आठवले यांना लोकसभेत पाठवत खासदार केले. त्यामुळे भाजपचा सत्तेत वाटा देणारा प्रस्ताव मान्य करत आठवले यांनी भाजपचा हाथ धरला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा