वादग्रस्त विधानांनी स्वत:ला आणि पक्षाला अडचणीत आणणाऱ्या आर. आर. पाटील यांनी या परंपरेत आणखी एका वादग्रस्त विधानाची भर घातली आहे. सांगली जिल्ह्य़ातील मनसेच्या एका उमेदवाराविरुद्ध दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्य़ाबाबत पाटील म्हणाले की, ‘‘आता त्याला (मनसेच्या उमेदवाराला) उभे करायचे होते तर किमान बलात्कार निवडणुकीनंतर तरी करायचा होता.’’
तासगाव-कवठे महांकाळ येथील मनसेचे उमेदवार सुधाकर खाडे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल आहे. त्या संदर्भात आबांनी शुक्रवारी रात्री कवठे एकंद येथील सभेत ही मुक्ताफळे उधळली.
या विधानाबाबत भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी जाहीर केले.
“गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या विरोधी उमेदवाराबद्दल उपरोधाने मी तसे बोललो. महिलांच्या अपमानाचा माझा हेतू नव्हता. माझ्या उपरोधी बोलण्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी पूर्ण माफी मागत आहे.”
-आर. आर. पाटील