अफझलखान ही महाराष्ट्राचे लचके तोडणारी प्रवृत्ती आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मुंबईमध्ये येऊन उद्योजकांना गुजरातेत येण्याचे निमंत्रण दिले. महाराष्ट्राचे लचके तोडण्याचीच ही प्रवृत्ती असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अफझलखान हा शब्द वापरला, अशी सारवासारव शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार बैठकीत केली.
लातूर जिल्हय़ातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ लातुरात आले असता ते बोलत होते. विदर्भ व मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा भाजपचा घाट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस बोलत असतानाही त्यांनी हस्तक्षेप केला नाही. मोदींनी पाकिस्तान काबीज करावा, अशी आमची अपेक्षा असताना ते महाराष्ट्र काबीज करण्यासाठी महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेपेक्षा देशाची सीमा सुरक्षा महत्त्वाची असल्याचे राऊत म्हणाले.

Story img Loader