पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आम्हाला कमालीचा आदर आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मला श्रद्दा असल्याने शिवसेनेवर टीका करायची नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले असून त्याचे आम्ही स्वागत करतो. पण मोदी यांनी २५ वष्रे असलेल्या मत्रीची जाणीव ठेवून केवळ पाचसहा जागांसाठी युती मोडण्याऐवजी ती युती टिकविली असती, तर तीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली ठरली असती, असे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले.
शिवसेनाप्रमुखांबाबत आदर असल्याने मी शिवसेनेवर टीका करणार नाही, असे मोदी यांनी रविवारी भाषणात सांगितल्यावर शिवसेनेत त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. युती तोडण्याचे आदेश किंवा हिरवा कंदील मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांनी प्रदेश नेत्यांना दाखविला. त्यांनी ठाकरे यांच्याशी चर्चा करुन युती टिकविण्याचा प्रयत्न केला नाही. शिवसेनेने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांच्याशी बोलणी करुनही त्याचा उपयोग झाला नाही.   
महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असून त्यांचा अजूनही जनमानसावर प्रभाव आहे. त्यामुळे मराठी माणसाची नाराजी आणि मराठी-गुजराती वाद निर्माण होऊ नये, यासाठी मोदी हे शिवसेनेवर किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे टाळत
आहेत.
 

Story img Loader