युती तुटल्याने भाजप किती मजबूत आहे, ते लक्षात आले, असे प्रतिपादन करीत ‘राष्ट्रीय पक्षच समर्थ व भक्कम सरकार देऊ शकतात’ असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला. प्रादेशिक पक्षांना केवळ स्वतचे अस्तित्व टिकवायचे असते, असे परखड मतप्रदर्शनही त्यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना केले. सत्ता आल्यावर सिंचन गैरव्यवहाराची फौजदारी चौकशी आणि आदर्श प्रकरणी फेरचौकशी करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल आणि नव्याने कृती अहवाल विधिमंडळात मांडले जातील, असे स्पष्ट करतानाच, कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
राज्यांच्या आर्थिक स्रोतांवर मर्यादा असतात आणि ती केंद्राच्या मदतीवर अवलंबून असतात. केंद्रात व राज्यात एकच सरकार असेल, तर समन्वय चांगला राहील, अधिकाधिक निधी राज्यासाठी आणता येईल व विकास साधता येईल.  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीतील वादग्रस्त प्रकरणांपैकी महत्वाच्या असलेल्या आदर्श व सिंचन गैरव्यवहारप्रकरणी राज्य सरकारने विधिमंडळात मांडलेले कृती अहवाल रद्द करुन ते नव्याने मांडले जातील. सीबीआयने केलेल्या तपासात नवीन पुरावे सादर करुन फेरचौकशीसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट केले.
मराठी-अमराठी हा मुद्दाच नाही
मराठी-अमराठी हा मुद्दाच नसून जनतेला विकास हवा आहे. त्यामुळे मराठी असो की अमराठी ते भाजपलाच मते देतील. भाजपला स्वबळावर बहुमत मिळेल असा दावा केला.
लोकप्रिय घोषणा नाहीत
गेल्या काही निवडणुकांमध्ये मोफत वीज, झोपडपट्टीवासियांना मोफत घरे अशा योजना  झाल्या. भाजपने या निवडणुकीत कोणतीही लोकप्रिय होणारी व निवडणूक फिरवू शकणारी घोषणा केली नाही, असे विचारता आम्ही सर्वागीण विकासाच्या मार्गाने जात आहोत. निवडणुकीतील लाभासाठी अव्यवहार्य योजना जाहीर करण्यापेक्षा दूरदृष्टी ठेवून वाटचाल केल्याचे स्पष्ट केले.

Story img Loader