माणसाची एखाद्यावर श्रद्धा असावी तर किती..? त्याच्यासाठी जीव लावण्यापासून तर त्याच्यासाठी जीव देण्यापर्यंत! ईश्वर मेश्राम ही अशीच वल्ली! भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या लहानपणापासून ते त्यांच्यासोबत आहेत. ‘जगणंही तुज्यासाठी आणि मरणंही तुज्यासाठी’ असं म्हणत ते फडणवीसांच्या मागे सावलीसारखे फिरतात. नागपुरात भाजपाचा कोणताही कार्यक्रम असो, ईश्वर तेथे नाही असं क्वचितच घडतं. ईश्वर गेल्या तीन दशकापासून धरमपेठेतील त्रिकोणी उद्यानासमोरच्या फडणवीसांच्या बंगल्यात जात आहेत. भाजपचे सक्रीय कार्यकर्ता म्हणून पडेल ते काम करत आहेत. सभेत सतरंज्या घालण्या-उचलण्यापासून, खुच्र्या मांडण्या-उचलण्यापर्यंत सारे काही करायला हा ईश्वर आघाडीवर असतो. अगदी सभेत फडणवीसांच्या मागे उभे राहण्यापासून तर सभेतील गर्दीत मागे उभे राहून जोरजोरात भाजपाचे नारे लावण्यापर्यंत साऱ्यात ईश्वरच आघाडीवर!
ईश्वर मेश्राम आता साठीच्या जवळ येऊन पोहोचलेत. नागपुरात त्यांना कुणी ओळखत नाही असं होतंच नाही. बाराही महिने ईश्वरच्या रिक्षावर भाजपाचे झेंडे लावलेले असतात. ते म्हणतात, ‘मी सक्रीय कार्यकर्ता. जातायेता कित्येक माणसं चिडवतात. मी त्यांना उत्तर देतो. लोकांशी झगडे पण करतो.’ ‘काही माणसं चांगली पण भेटतात. काका रुका ना, म्हणतात. मग मी थांबतो आणि जेवढे पैसे दिले, तेवढय़ा पैशात त्यांना नेऊन सोडतो.’ ईश्वर शाळकरी मुलांची ने-आण करतात आणि रिकामा वेळ मात्र फडणवीसांच्या वाडय़ावर! फडणवीसांची जेवढी स्वीय सहाय्यक मंडळी आहेत, त्यांच्या कामालासुद्धा ईश्वर यांची ‘ना’ नसते. कदाचित म्हणूनच ते दिसले नाहीत, तर साऱ्यांचाच जीव कासावीस होतो. ‘काका, यांच्यात तुम्ही इतके कसे हो रंगले?’ असे विचारले तर हात जमिनीपासून दोन फुटावर हात घेऊन सांगतात, ‘लहानपणापासून पाहतो ना त्यांना..’ मग हळूच फडणवीसांच्या लहानपणची आठवण सांगतात. ‘घरासमोरच्याच त्रिकोणी उद्यानात देवेंद्र फडणवीस काही पोरांसोबत क्रिकेट खेळत होते. काहींनी भाऊंसोबत चकल्लस केली आणि माजा दिमाग सटकला. मग मीही त्या पोरांशी झगडा केला.’ फडणवीसांनाही त्यांच्या त्या कामाची तेवढीच जाण आहे. त्यामुळे ईश्वर बराच काळ नजरेसमोर नसले, तर त्यांनाही चुकल्यासारखे वाटते. आजही फडणवीसांविषयी कुणी काही बोललं तर त्यांना ते सहन होत नाही. ‘लहानपणापासून ओळखतो ना जी त्यांना’, असंच त्यांचं उत्तर असतं. ‘त्यांच्यासारखा माणूसच नाही. मला आता त्यांच्यासोबतच घुमाचे आहे. शेवटपर्यंत काम कराचे आहे,’असे ते सांगतात. आज ईश्वरभाऊंची मुलगी विज्ञान पदवीधर झाली तर मुलगा आयटीआयला आहे. रिक्षा चालविणारे ईश्वर चौथी पास आहेत. त्यांची पत्नी मात्र द्विपदवीधर आहे. ईश्वरभाऊंनी मात्र आपलं संपूर्ण आयुष्य जणू फडणवीसांना समर्पित केलं आहे.
निवडणुकीतील नारायण :फडणवीसांची ‘सावली’
माणसाची एखाद्यावर श्रद्धा असावी तर किती..? त्याच्यासाठी जीव लावण्यापासून तर त्याच्यासाठी जीव देण्यापर्यंत! ईश्वर मेश्राम ही अशीच वल्ली! भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या लहानपणापासून ते त्यांच्यासोबत आहेत.
First published on: 07-10-2014 at 04:43 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shadow of devendra fadnavis