शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गल्लीपुरता मर्यादित नेते असल्याची झणझणीत टीका भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात सभा घेत आहेत, त्याचेही त्यांनी समर्थन केले आहे.
भाजप राष्ट्रीय पक्ष असून, मोदी आमचे नेते आहेत. राज्यात आपल्या पक्षाचे सरकार आणण्यासाठी मोदी सभा घेत असतील, तर त्यात चुकीचे काय, असा सवाल उपस्थित करून भाजप आणि कॉंग्रेसवगळता राज्यातील इतर पक्ष प्रादेशिक असून त्यांच्या नेत्यांनी कितीही घसा कोरडा केला, तरी त्यांचे नेते केवळ गल्लीपुरता मर्यादित असल्याची टीका खडसे यांनी केली.
राज्यातील नालायक आणि भ्रष्ट सरकार खाली खेचणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे आत्ता आमचे प्राधान्य नाही, असे सांगून खडसे म्हणाले, मुख्यमंत्रीपदाची इच्छा बाळगण्यात गैर काय आहे. २५-३० वर्षे राजकीय जीवनात असणाऱया व्यक्तीने मुख्यमंत्री बनण्याची इच्छा बाळगणे चुकीचे नाही. पण भाजपमध्ये नेत्याची निवड करताना लोकशाही पद्धत वापरली जाते. संसदीय पक्ष जो निर्णय देईल, तो मान्य करून काम करावं लागते. जर संसदीय पक्षाने मला नेतृत्त्व करण्यास सांगितले, तर चांगलेच आहे. नाहीतर आपण पक्षाचे काम करत राहू, असेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar raj and uddhav local leaders says eknath khadse