बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे घराण्यातील कोणीही थेट सत्तेत जाणार नाही, असे मत व्यक्त केले होते. आता जर या भूमिकेत कोणी जर बदल केला असेल, तर मला त्याची कल्पना नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा मंगळवारी येथे होणार आहे, या पाश्र्वभूमीवर राजकीय घडामोडींबाबत पवार बोलत होते. महायुतीतील जागावाटपातील गोंधळ व उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची मनीषा याबाबत बोलताना ते म्हणाले, त्यांच्यामध्ये मुळात वाद नाहीच. भाजप ज्या प्रमाणे सांगेल त्याच पद्धतीने शिवसेना राहील. कारण लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या १९ पकी ११ जागा नरेंद्र मोदीमुळे आल्या आहेत याची जाणीव उद्धव ठाकरेंना असावी. बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे घराण्यातील कोणीही थेट सत्तेत जाणार नाही असे मत व्यक्त केले होते. आता जर या भूमिकेत कोणी जर बदल केला असेल, तर मला त्याची कल्पना नाही.
नरेंद्र मोदी यांच्या शंभर दिवसांच्या कामगिरीविषयी विचारता पवार म्हणाले, मोदी सरकारमध्ये मोजके लोकच निर्णय घेतात. संघ भावना दिसत नाही ती असल्याशिवाय देश चालविता येत नाही. नको त्या शक्ती या काळात पुढे येताना दिसत आहेत.
आघाडीतील जागा वाटपाच्या सद्य:स्थितीबाबत पवार म्हणाले, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवणार असून जागा वाटप अजून निश्चित झालेले नाही. सोनिया गांधी सध्या देशाबाहेर असून त्या एकदोन दिवसांत परतल्यानंतर जागावाटपाबाबत चर्चा होईल. ती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी यादी जाहीर करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

Story img Loader