पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या संसदीय मंडळाच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत शिवसेना-भाजप युतीच्या भवितव्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. शिवसेनेने थेट मोदींना ‘लक्ष्य’ करुनही आणि भाजपवर तोंडसुख घेतल्यानंतरही ‘नमो नम’ करीत ‘ आणखी काही जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या  ‘मातोश्री’ निवासस्थानी जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात युतीचा घट बसणार की स्वतंत्र घट बसणार, हे घटस्थापनेच्या दिवशी ठरण्याची चिन्हे आहेत. भाजप लढवीत असलेल्या ११९ जागांपैकी सुमारे १०० जागांवरील उमेदवारांच्या नावावर संसदीय मंडळाने शिक्कामोर्तब केले असून ही यादी सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यानंतर विरोधकांवर तोफा धडाडण्याऐवजी महायुतीतील शिवसेना-भाजप व अन्य पक्ष एकमेकांवरच बार उडवीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरी शैलीत भाजपवर तोंडसुख घेतल्यानंतरही भाजप ‘नमो नम’ करीत अजून ‘आणखी काही जागा द्या, ’ अशा विनवण्या करीत चर्चेचे गुऱ्हाळ सुरु ठेवण्याच्या भूमिकेत आहे. ‘शिवसेना झुकणार नाही, ’ हा मराठी कणखर बाणा दाखवत ठाकरे यांनी भाजपला नमते घेण्यास भाग पाडले आहे. शिवसेनेने १८ जागा सोडल्या तरी, भाजपची एकही जागा न वाढविण्याची राजकीय खेळी केल्याने भाजप अस्वस्थ आहे. शिवसेनेकडून भाजपला चेपण्याची भूमिका घेतली जाऊनही आता नवीन सूत्र घेऊन भाजप नेते ठाकरे यांच्याशी चर्चा करतील.
त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि घटकपक्षही वैतागले आहेत. भाजपचे धोरण नेमके काय अशी चर्चा सुरु झाली
आहे. शिवसेनेच्या ताकदीचा अंदाज आल्याने आणि स्वबळावर सत्ता मिळेल, याची खात्री वाटत नसल्याने भाजप नेते आता नरमाईच्या भूमिकेत गेले आहेत. भाजप नेते चर्चेला येत असल्याने शिवसेनाही दोन-तीन दिवस वाट पाहणार आहे. शिवसेनेच्या सर्व २८८ उमेदवारांची यादी तयार असून भाजपला युती टिकवायची नसेल, तर कोणत्याही क्षणी यादी जाहीर करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे युतीचे भवितव्य घटस्थापनेच्या दिवशीच स्पष्ट होईल, असे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा