भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत जागावाटपांवरून सुरू असलेल्या लाथाळ्या आणि खडाखडी मिटण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. महायुती टिकविण्याबाबत आशावादी असल्याचा दावा भाजपतर्फे करण्यात आला असतानाच तिढा सोडविण्याकरिता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज, मंगळवारी बैठक होणार आहे. कोणताही निर्णय घेण्यासाठी सर्वच पक्षांना पितृपक्ष संपण्याची प्रतीक्षा असून, बुधवारी सर्वपित्री अमावस्या संपताच सायंकाळी दोन्ही गटांची समीकरणे उगलगडण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचा प्रस्ताव भाजपने फेटाळून लावला असला तरी शिवसेनेने पुन्हा बोलणी सुरू करण्यासंदर्भात काहीच प्रतिसाद दिलेला नाही. महायुतीसाठी शिवसेनेची मानसिकता दिसत नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मात्र महायुती टिकण्यासाठी आम्ही अजूनही आशावादी आहोत, असे राज्याचे भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथूर यांनी सांगितले. एकूणच भाजपने माघार घ्यायची नाही, असे संकेत दिले आहेत. भाजपने प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार यांची मंगळवारी तातडीची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत शिवसेनेला प्रत्युत्तर दिले जाईल, अशी चिन्हे आहेत.
महायुतीच्या घडामोडींकडे बारीक नजर ठेवून असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एक पाऊल तूर्तास तरी मागे घेतले. काँग्रेसचा १२४ जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीने अमान्य केला असला तरी कोंडी फोडण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न झाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अहमद पटेल यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधून चर्चेची तयारी दर्शविली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आघाडीचा निर्णय घेण्याकरिता राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद आल्याने राष्ट्रवादीने आघाडीबाबत कोणताही निर्णय घेण्याचे टाळले. काँग्रेसने जागा वाढवून दिल्यास विचार करता येईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे महायुतीकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले संतप्त झाले आहेत. महायुती तुटल्यास राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याचा पर्याय खुला असल्याचे आठवले यांनी सूचित केले.
भाजपचा १३० जागांचा नवा प्रस्ताव
युतीच्या गोटातून परस्परांसमोर नवनवीन प्रस्ताव येत असतानाच आता जागांचा तिढा सोडवण्यासाठी भाजपने १३० जागांचा नवा प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवला आहे. शिवसेनेने देऊ केलेल्या ११९ जागांऐवजी हा १३० जागांचा नवा प्रस्ताव शिवसेनेकडे पाठवण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र भाजपचे प्रभारी राजीवप्रताप रुडी यांनी सोमवारी दिल्लीत दिली.
बुधवारची प्रतीक्षा
राजकारण्यांच्या दृष्टीने अशुभ असणारा पितृपंधरवडा बुधवारी संपत आहे. सर्वपित्री अमावस्या बुधवारी दुपारी पावणेबारा वाजेपर्यंत असून, त्यानंतरच महायुती किंवा आघाडीचे भवितव्य ठरण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी बुधवारी आपापली भूमिका
जाहीर करणार आहेत.