कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतील विधानसभेच्या आठ जागांपैकी पाच जागांवर विजय मिळवत शिवसेनेने प्रभाव कायम राखला आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच मतदारसंघांपैकी चिपळूणमध्ये सेनेचे आमदार सदानंद चव्हाण, माजी मंत्री सामंत (रत्नागिरी) आणि आमदार राजन साळवी (राजापूर) यांनी विजय नोंदवले; पण दापोली मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी झालेल्या सूर्यकांत दळवी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कदम यांनी पराभूत केले. तसेच राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी गुहागर मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यावर अपेक्षेनुसार दणदणीत विजय मिळवला.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील पाच मतदारसंघांपैकी दापोली मतदारसंघामध्ये आमदार दळवी यांची मुख्य लढत राष्ट्रवादीचे कदम यांच्याशी असली तरी कुणबी समाजोन्नती संघाचे शशिकांत धाडवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर देसाई यांच्यामुळे ही निवडणूक रंगतदार बनली. प्रत्येक फेरीनुसार विजयाचे पारडे कधी दळवी, तर कधी कदम यांच्याकडे झुकत होते; पण शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये कदम यांनी सलग आघाडी घेत अखेर ३ हजार ७४२ मतांनी विजय मिळवला. गुहागर मतदारसंघात राष्ट्रवादीचे जाधव आणि भाजपचे डॉ. नातू यांच्यात झालेल्या सरळ लढतीत जाधव यांनी ३२ हजार ७६४ मतांनी मोठा विजय मिळवला. या मतदारसंघातून शिवसेनेचे विजय भोसले यांनी ३२ हजार ०८३ मते मिळवली; पण काँग्रेसचे संदीप सावंत यांच्यासह अन्य उमेदवारांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही.
चिपळूण मतदारसंघामध्येही शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यात चुरशीची लढत झाली; पण शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये चव्हाण यांनी आघाडी घेत अखेर ६ हजार १४० मतांनी विजय प्राप्त केला.
रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत आणि भाजपचे माजी आमदार बाळ माने या परंपरागत प्रतिस्पध्र्याची लढत रंगतदार होईल, अशी अपेक्षा होती; पण सामंत यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत अखेर ३८ हजार ८५६ मतांनी माने यांचा दणदणीत पराभव केला.
राजापूर मतदारसंघामध्ये मात्र सेनेचे आमदार राजन साळवी यांच्याविरोधातील काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप या तिन्ही पक्षांचे उमेदवार दुबळे असल्याने साळवी यांनी ३८ हजार ६३६ मतांनी सहज विजय मिळवला.
नारायण राणेंना पराभवाचा धक्का
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदारसंघांपकी कुडाळ मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा धक्कादायक पराभव झाला. सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी त्यांच्यावर सुमारे दहा हजार मतांनी विजय मिळवत मागील पराभवाचा वचपा काढला. कणकवली मतदारसंघातून मात्र राणेंचे चिरंजीव नितेश यांनी भाजपचे आमदार प्रमोद जठार यांना २५ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभूत करीत या पराभवाची काहीशी परतफेड केली. शिवसेनेत प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक केसरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेले राणे समर्थक राजन तेली यांचा सुमारे ४० हजार मतांनी पराभव करीत सिंधुदुर्गातील सेनेच्या प्रभावी पुनरागमनाला मोठा हातभार लावला.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून नेते व कार्यकर्त्यांशी संघर्ष शक्य नसल्यामुळे पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासारख्या प्रवृत्तीच्या लोकांबरोबर एकत्र राहणे अशक्य झाले होते. म्हणून अखेर शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.”
– उदय सामंत.
लक्षवेधी निकाल
कुडाळ मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा पाडाव हा कोकणातील सेनेच्या यशातील शिरपेच ठरला. शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी त्यांचा पराभव केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राणे यांचे चिरंजीव निलेश यांचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील मतदारांनी दणदणीत पराभव करत राणे कुटुंबाबद्दलची नाराजी व्यक्त केली होती. तीच भावना याही निवडणुकीत कायम राहिली.
दापोली मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी झालेले सेनेचे सूर्यकांत दळवी यांना पक्षांतर्गत नाराजी भोवली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेतून आलेले संजय कदम यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर देसाई यांनी बंडखोरी केली. त्यामुळे गेली २५ वष्रे सेनेसाठी अभेद्य राहिलेल्या या मतदारसंघात कदम यांनी पक्षांतर्गत बंडखोरी मोडून काढत चमकदार विजय मिळवला.
पनवेलमध्येही ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची लढाई होती. मात्र मतमोजणीत सुरुवातीच्या पिछाडीनंतर जोरदार मुसंडी मारत त्यांनी शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांचा १३ हजार २१५ मतांनी पराभव केला.