कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतील विधानसभेच्या आठ जागांपैकी पाच जागांवर विजय मिळवत शिवसेनेने प्रभाव कायम राखला आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच मतदारसंघांपैकी चिपळूणमध्ये सेनेचे आमदार सदानंद चव्हाण, माजी मंत्री सामंत (रत्नागिरी) आणि आमदार राजन साळवी (राजापूर) यांनी विजय नोंदवले; पण दापोली मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी झालेल्या सूर्यकांत दळवी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कदम यांनी पराभूत केले. तसेच राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी गुहागर मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यावर अपेक्षेनुसार दणदणीत विजय मिळवला.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील पाच मतदारसंघांपैकी दापोली मतदारसंघामध्ये आमदार दळवी यांची मुख्य लढत राष्ट्रवादीचे कदम यांच्याशी असली तरी कुणबी समाजोन्नती संघाचे शशिकांत धाडवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर देसाई यांच्यामुळे ही निवडणूक रंगतदार बनली. प्रत्येक फेरीनुसार विजयाचे पारडे कधी दळवी, तर कधी कदम यांच्याकडे झुकत होते; पण शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये कदम यांनी सलग आघाडी घेत अखेर ३ हजार ७४२ मतांनी विजय मिळवला.
चिपळूण मतदारसंघामध्येही शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यात चुरशीची लढत झाली; पण शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये चव्हाण यांनी आघाडी घेत अखेर ६ हजार १४० मतांनी विजय प्राप्त केला.
रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत आणि भाजपचे माजी आमदार बाळ माने या परंपरागत प्रतिस्पध्र्याची लढत रंगतदार होईल, अशी अपेक्षा होती; पण सामंत यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत अखेर ३८ हजार ८५६ मतांनी माने यांचा दणदणीत पराभव केला.
राजापूर मतदारसंघामध्ये मात्र सेनेचे आमदार राजन साळवी यांच्याविरोधातील काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप या तिन्ही पक्षांचे उमेदवार दुबळे असल्याने साळवी यांनी ३८ हजार ६३६ मतांनी सहज विजय मिळवला.
नारायण राणेंना पराभवाचा धक्का
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदारसंघांपकी कुडाळ मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा धक्कादायक पराभव झाला. सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी त्यांच्यावर सुमारे दहा हजार मतांनी विजय मिळवत मागील पराभवाचा वचपा काढला. कणकवली मतदारसंघातून मात्र राणेंचे चिरंजीव नितेश यांनी भाजपचे आमदार प्रमोद जठार यांना २५ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभूत करीत या पराभवाची काहीशी परतफेड केली. शिवसेनेत प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक केसरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेले राणे समर्थक राजन तेली यांचा सुमारे ४० हजार मतांनी पराभव करीत सिंधुदुर्गातील सेनेच्या प्रभावी पुनरागमनाला मोठा हातभार लावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा