पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल श्रद्धा व्यक्त करीत असताना ‘मातोश्री’वरून आम्हाला ‘अफझलखानाची फौज’ ठरविणारी टीका यातनादायी असल्याचे मत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी येथे व्यक्त केले. सांगली व मिरज येथील भाजपच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी निवडणुकीच्या रणांगणावर अशी टीका अयोग्य असून, ‘मातोश्री’ने याबाबत मर्यादा सांभाळून टीका करावी असे आवाहनही केले.
विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र काबीज करण्यासाठी मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री महाराष्ट्रात उतरले असल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी ही ‘अफझलखानाची फौज’ उतरल्याची टीका केली होती. या टीकेकडे लक्ष वेधत स्वराज यांनी आज जाहीर सभेत सांगितले, की राज्यात २५ वर्षांची सेनेशी असणारी युती तुटली याचे आम्हाला दु:ख आहे. मात्र आजही आम्हाला ‘मातोश्री’बद्दल आदर असून बाळासाहेबांबद्दल श्रद्धा आहे.
आमच्यावर टीका करीत असताना उध्दव यांनी संयम पाळावा अशी अपेक्षा असून, निवडणूक प्रचार वैयक्तिक पातळीवर येऊन करणे अयोग्य आहे. आमच्यासोबत असणाऱ्या घटक पक्षांना सन्मानाची वागणूक देणार आहे.
राज्याचे देशातील एक नंबरचे स्थान दोन्ही काँग्रेसच्या आघाडी शासनामुळे घसरले असून, स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त शासन हा भाजपचा नारा आहे. महाराष्ट्रातील कृषी विकास दर अन्य राज्यांच्या तुलनेत खाली गेला असून, औद्योगिक गुंतवणुकीला महाराष्ट्रापेक्षा गुजरात आणि मध्य प्रदेशाला महत्त्व दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Story img Loader