परपक्षांतील आयारामांना आपले म्हणत जिल्ह्य़ातील तिकीटवाटपात निष्ठावंतांना डावलणारा शिंदे पॅटर्न ठाण्यातील शिवसेनेसाठी आता डोकेदुखीचा विषय ठरू लागला असून भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत शिवसेनेविरोधात उघड बंड करणाऱ्या बंडोबांनी शनिवारी दिवसभर शिवसेना नेत्यांना अक्षरश: सळो की पळो करून सोडले. पक्षाचे संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघात शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी बंडाचा भगवा खांद्यावर थेट भारतीय जनता पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तरे यांच्यापाठोपाठ कल्याण ग्रामीण मतदारसंघातून रमेश सुक ऱ्या म्हात्रे यांनीही भाजपला आपलेसे करीत शिवसेनेतील शिंदेशाहीला आव्हान उभे केले. कल्याण, डोंबिवली परिसरात शिवसेनेत जोरदार लाथाळ्या सुरू झाल्या असून येत्या काही दिवसांत हे बंड थोपविताना सेना नेत्यांना घाम फुटेल, असे चित्र दिसू लागले आहे.
उमेदवाराचे नाव अंतिम करताना गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्य़ातील स्थानिक शिवसेना नेत्यांनी घातलेला घोळ पाहता शनिवारी निर्माण झालेले बंडाळ्यांचे चित्र अनेकांना अपेक्षितच होते.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत
मोठय़ा मताधिक्याने पराभूत होऊनही एकनाथ िशदे यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघासाठी सुभाष भोईर यांचा नावाचा आग्रह धरला आणि तेथेच या बंडाळ्यांना सुरुवात झाली. डोंबिवलीशी खेटून असलेल्या या मतदारसंघात या भागातील २२ गावांमधील मते निर्णायक मानली जातात.
कल्याणातही बंडाचे वारे
ठाण्यापाठोपाठ कल्याण, डोंबिवलीत झालेली बंडखोरी रोखणे शिवसेनेला शक्य झालेले नाही. कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे विजय साळवी यांच्याविरोधात अरिवद मोरे या शहरप्रमुखाने बंडाचे हत्यार उगारले असून डोंबिवलीत दिपेश म्हात्रे यांना आव्हान देत माजी शहरप्रमुख सदा थरवळ यांनीही बंडाची भाषा सुरु केली आहे. याच मतदारसंघात भाजपमधून चिंतन जोशी यांनी बंडखोरी केली असून कल्याण पुर्वेत भाजपने मोरेश्वर भोईर यांना मनसेतून आयात करत ऊमेदवारी दिली आहे. नवी मुंबईत युवा सेनाप्रमुख वैभव नाईक यांनी केलेला भाजप प्रवेश हादेखील एकनाथ िशदे यांना धक्का मानला जात आहे.
अंबरनाथमध्येही शिवसेना बंडखोरास भाजपची उमेदवारी
अंबरनाथ विधानसभा मतदार संघातही शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसला आहे. अनुसुचित जाती जमातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदार संघातून उमेदवारीसाठी इच्छुक असणारे राजेश वानखडे यांनी विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना पक्षाने पुन्हा तिकीट दिल्याचे समजताच पक्षाला जय महाराष्ट्र केला. भाजपने त्यांना तिकीट दिले आहे.