भाजपशी युती तुटल्यानंतर कोकणात प्रथमच स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणाऱ्या शिवसेनेने रत्नागिरीचा गड राखत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या एकाधिकारशाहीला सुरुंग लावत दमदार पुनरागमन केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच मतदारसंघांपकी दापोली, चिपळूण आणि राजापूर या तीन ठिकाणी मागील निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला होता. त्यापैकी यंदाच्या निवडणुकीत दापोलीची जागा सेनेला गमवावी लागली असली तरी माजी मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी मतदारसंघात मोठा विजय मिळवत जिल्ह्य़ात सेनेचे वर्चस्व कायम राखले. त्याचप्रमाणे दहा वर्षांपूर्वी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा पराभव करत राणे यांची सद्दी संपवली. शेजारच्या सावंतवाडी मतदारसंघातून सेनेचे दीपक केसरकर यांनीही मोठा विजय मिळवल्यामुळे सुमारे दशकभराच्या खंडानंतर रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सेनेची पकड पुन्हा प्रस्थापित झाली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना राष्ट्रवादीतून आलेल्या सामंत आणि केसरकरांची मदत घ्यावी लागली आहे.
दापोली मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी झालेले सेनेचे सूर्यकांत दळवी यांना पक्षांतर्गत नाराजी भोवली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेतून आलेले संजय कदम यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर देसाई यांनी बंडखोरी केली. त्याचबरोबर कुणबी समाजोन्नती संघाचे शशिकांत धाडवे यांच्या उमेदवारीमुळे सेनेची परंपरागत मतपेढी फुटली. त्यामुळे गेली २५ वष्रे सेनेसाठी अभेद्य राहिलेल्या या मतदारसंघात कदम यांनी पक्षांतर्गत बंडखोरी मोडून काढत चमकदार विजय मिळवला.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी भाजपचे बाळ माने यांच्याविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. त्यांच्या अचानक पक्षांतरामुळे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला विलक्षण अस्वस्थता होती. पण पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काम करण्याच्या सेनेच्या कार्यपद्धतीमुळे सामंत यांना शिवसैनिकांची भक्कम साथ मिळाली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील त्यांना मानणाऱ्या गटानेही व्यक्तिगत पातळीवर मतदान केल्यामुळे सामंतांचा विजय सुकर झाला आणि तालुक्यातील भाजपच्या मर्यादा उघडय़ा पडल्या.
कुडाळ मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा पाडाव हा कोकणातील सेनेच्या यशातील शिरपेच ठरला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राणे यांचे चिरंजीव निलेश यांचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील मतदारांनी दणदणीत पराभव करत राणे कुटुंबाबद्दलची नाराजी व्यक्त केली होती. तीच भावना याही निवडणुकीत कायम राहिल्यामुळे प्रचारात राणे यांनी अतिशय मवाळ धोरण ठेवूनही पराभव पत्करावा लागला. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांनी सेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा कोकणातून सेनेला उखडून टाकण्याची गर्जना केली होती. पण २००९ च्या निवडणुकांनंतर राणेंचेच राजकीय बळ झपाटय़ाने खालावत गेले आणि या निवडणुकीत कोकणी जनतेने राणे पिता-पुत्रांचा मनमानी कारभार संपवण्याचा इरादा कायम राखत ‘थोरल्या’ साहेबांचा पराभव केला. मात्र धाकटय़ा पातीला विजयी करत राणे कुटुंबाला सुधारण्याची संधीही दिली आहे.
कोकणात शिवसेनेचे वर्चस्व!
भाजपशी युती तुटल्यानंतर कोकणात प्रथमच स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणाऱ्या शिवसेनेने रत्नागिरीचा गड राखत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या एकाधिकारशाहीला सुरुंग लावत दमदार पुनरागमन केले आहे.
आणखी वाचा
First published on: 20-10-2014 at 06:01 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena strong in konkan