विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करून शुक्रवारी निवडणुकीचे बिगूल फुंकण्याचा प्रयत्न केला. ठाणे पश्चिमेतील इटर्निटी मॉलच्या शेजारील भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाणार असून या स्मारकासाठी सुमारे ११ कोटी १५ लाखांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या प्रभागात हे स्मारक उभारले जाणार आहे.
या स्मारकात दोन इमारती असून त्यापैकी एक इमारत ही पिरॅमिड आकाराची असणार आहे. पिरॅमिड पद्धतीने छत असलेली व पारदर्शक काचेसारख्या साहित्याचा वापर यामध्ये करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये कला दालन, प्रदर्शनीय चलचित्रे, सामुदायिक एकाग्रता केंद्र, मोठी दालने, विद्युत आणि संगीताची जुगलबंदी असलेला कार्यक्रम, या सर्वाचा समावेश पहिल्या इमारतीमध्ये करण्यात येणार आहे, तर दुसऱ्या इमारतीमध्ये व्यंगचित्र दालन, कला स्टुडिओ, ग्रंथालय, अभ्यासिका, कलाकारांसाठी निवासाची व्यवस्था, योग दालन, अॅम्पीथिएटर अशा बाबींचा समावेश केला जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा