विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीत जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदावरून ताणाताणी सुरू असतानाच, शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रात कोणकोणत्या क्षेत्रात विकास घडवून आणायचा आहे, याचे व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या हातात पाटी-पेन्सिल-पुस्तकांऐवजी टॅब देण्याची घोषणा करण्यात आली. व्हिजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे शिवसेनेचे हे व्हिजन डॉक्युमेंट आहे की, स्वतंत्र जाहीरनामा, अशी चर्चा आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र हा स्वतंत्र जाहीरनामा नाही, असे स्पष्ट केले.
पूर्वीचे सूत्र बदलून भाजपने मागितलेल्या अधिक जागा व भाजपने मुख्यमंत्रीपदावर आक्रमकपणे केलेला दावा या दोन कळीच्या मुद्यावरूनच भाजप-सेनेत अंतर्गत वाद आहे. त्यातूनच गेल्या पंचवीस वर्षांपासून अस्तित्वात असलेली  युती तुटणार की काय, अशी शंकाही उपस्थित केली जाऊ लागली. उद्धव ठाकरे यांनी मात्र चाणाक्षपणे या वादावार कोणतेही भाष्य करण्याचे टाळले.
महायुतीत सर्व काही अलबेल नाही, याचे ठायीठायी प्रदर्शन होत असतानाच शिवसेनेने राज्यात आमचे सरकार आल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात विकास करायचा आहे, कोणत्या योजना राबवायच्या आहेत याविषयीचे व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले. गुरुवारी खास पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांनी शिक्षण क्षेत्रात इ-क्रांती घडवून आणण्याचा मानस असलेल्या व्हिजन डॉक्युमेंटचा दुसरा भाग प्रसिद्ध केला. त्यावेळी साहजिकच महायुतीचा संयुक्त जाहीरनामा अजून प्रसिद्ध व्हायचा असताना हा शिवसेनेचा स्वंतत्र जाहीरनामा आहे का, असे विचारले असता, त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्याचा इन्कार केला. मात्र ही शिवसेनेची ई-प्रबोधन योजना असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
उद्धव यांचे आडवळण!
शिक्षकदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकवण्यावरून सध्या देशभर वादळ उठले आहे. भाषण ऐकण्याची सक्ती कशासाठी असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. मोदी यांचे भाषण ऐकण्याची विद्यार्थ्यांना सक्ती करणे योग्य आहे का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर भाषण ऐकण्याची सक्ती असावी का नसावी किंवा ते ऐच्छिक असावे का, यापेक्षा ज्यांच्यासाठी ते भाषण आहे, त्यांच्यापर्यंत ते पोचावे, असे आडवळणाचे उत्तर त्यांनी दिले.

Story img Loader