रामदास आठवले यांच्यानंतर शिवसेनेने आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपसोबत जाण्याचा रासपचा निर्णय शिवसेनेला चांगलाच झोंबला असून, त्यांनी आता पक्षाचे मुखपत्र ‘सामना’तील अग्रलेखामधून जानकरांवर हल्ला चढविला आहे. भाजपसोबत जाण्याच्या निर्णयामुळे जानकरांच्या हाती नक्की काय लागले, हा संशोधनाचा विषय असल्याचे सांगून आठवल्यांसारखाच अनुभव जानकरांनाही आलाच ना, असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.
जानकर हे राष्ट्रीय समाज पार्टीचे महापुरुष आहेत व त्यांच्या हातावरही भाजपने पाचेक पडीक जागा ठेवल्या आहेत. पण तरीही आपण कसे समाधानी आहोत हे महादेवराव पडीक चेहर्‍याने सांगत आहेत. मात्र सत्य असे आहे की, श्रीगोंदा, माढा या जागांवर त्यांचा डोळा होता व त्या त्यांना मिळाल्या नसल्याने जानकर म्हणे संतापले आहेत आणि संपूर्ण देशात नव्हे तर जगात भाजपास धडा शिकवतो असे क्रांतिकारक विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागले असावेत, असे या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.
जानकरांना अमेरिका, रशिया, जपानसारख्या देशांत ‘हायकमिशनर’ म्हणून पाठविण्याचे आश्‍वासन दिले असावे. म्हणूनच स्वाभिमानाची व धनगर समाजाच्या अस्मितेची लढाई लढण्याची भाषा करणारे महादेवराव इतक्या अपमानानंतरही गप्प बसले आहेत, अशीही टीका शिवसेनेने त्यांच्यावर केलेली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सत्तेवर आल्यास धनगर समाजाच्या सर्व मागण्यांचा विचार करण्यात येईल. या समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असेही आश्वासन देण्यात आले आहे.

Story img Loader