गेल्या तीन वर्षात मुख्यमंत्री पदावर असताना धोरण लकवा मारल्यामुळे फाईल्सवर सही न करणारे पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी १५ दिवसांत मध्यरात्रीपर्यंत जागून ‘वर्षा’वर कोणत्या बिल्डरांच्या फाईल्सवर सह्या केल्या आणि त्याचा फायदा कोणाला झाला. याची भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास विशेष पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात येईल असा इशारा शनिवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी कराडमध्ये दिला.
दक्षिण कराडमधील भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्या निवडणूक प्रचारात ते बोलत होते. चव्हाण यांनी आपल्या कारकिर्दीत फक्त स्वच्छ प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी नेहमीच भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घातले असा आरोपही तावडे यांनी यावेळी केला. आमचा महाराष्ट्र पुढे अशा जाहिराती करणाऱ्या आघाडी सरकारने महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्राला पुढे नेले, शेतकरी आत्महत्या, बेरोजगार, महिलांवरील बलात्कार आणि भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्राला पुढे नेले अशी टिकेची झोडही तावडे यांनी उठविली.

Story img Loader