निवडणूक प्रचार सभा, गल्ली सभा यापेक्षा काही मिनिटांच्या आत लाखो-कोटय़वधीं मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून या माध्यमाच्या मदतीने दोन कोटी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे मिशन आहे.  
राजकीय पक्षांच्या या विशेष विभागात हौशी लेखक, कलाकार, ग्राफिक डिझायनर काम करत असून त्यांच्या माध्यमातून विविध प्रकारचा मजकूर तयार करून घेण्याचे काम केले जात आहे. यातून तयार झालेला मजकूर काही पक्ष स्वत:च विविध सोशल मीडिया साईट्सवर अपलोड करत आहेत तर काहींनी यासाठी खाजगी कंपन्यांची नेमणूक केली आहे.
स्वस्त अर्थकारण
एखाद्या वर्तमानपत्राच्या वाचक संख्येच्या कितीतरी पट जास्त वाचकसंख्या सोशल मीडियामध्ये असते. नेमके हेच लक्षात घेऊन सर्वानी इकडे धाव घेतली आहे. यावर एखादी पोस्ट करावयाची असेल तर आपल्याला केवळ इंटरनेटसाठी येणारा खर्च लागतो. अनेक उमेदवारांनी आपले फेसबुक पेज, ट्विटर हँडल आदी गोष्टी आकर्षक व्हाव्यात यासाठी काही व्यावसायिक माणसांची किंवा कंपन्यांची नियुक्ती केली आहे. हे सर्व करूनही एखादा उमेदवार निवडणूक प्रचाराच्या महिनाभराच्या काळात दोन ते अडीच लाख रुपयांमध्ये चांगल्याप्रकारे प्रचार करू शकतो.
व्हॉट्स अ‍ॅपचे अस्त्र
काही पक्षांनी वेगवेगळ्या कंपन्यांना काम देऊन व्हॉट्सअ‍ॅप-ब्रॉडकास्टच्या माध्यमातून जाहिराती पोहचवण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी एका पोस्टला एक ते तीन रुपये आकारले जात आहेत.  ‘भाजप’ने एका मुख्य केंद्राची निर्मिती केली असून प्रत्येक लोकसभा मतदार संघासाठी एका प्रमुखाची नेमणूक केली आहे. त्याखालोखाल विधानसभा मतदासंघ प्रमुख, विभाग प्रमुख, शक्ती प्रमुख असे जाळे तयार केले आहे. प्रत्येक टप्प्यावर विविध ग्रुप्स तयार करण्यात आले असून मुख्य केंद्रातून पाठविण्यात आलेला संदेश १० ते १२ मिनिटात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो. ही यंत्रणा चालविण्यासाठी ७० जणांचा चमू काम करत असल्याची माहिती पक्षाच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाचे राष्ट्रीय सह संयोजक विनित गोएंका यांनी दिली.  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोशल मिडियाची जबाबदारी सांभाळणारे आनंद परांजपे यांनी सांगितले, सध्याचा तरूण व्हॉट्स अ‍ॅपचे वाचन मात्र जरूर करतो. यामुळे या माध्यमाचा वापर प्रभावी ठरतो आहे. ‘मनसे’ची ब्लू प्रिंट जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष पथकाद्वारे काम सुरू झाल्याचे मनविसेचे उपाध्यक्ष सुधाकर तांबोळी यांनी स्पष्ट केले.
अ‍ॅड कॅम्पेन
सोशल मीडियावरूनही अ‍ॅड कॅम्पेन केले जाते. पण अनेकजण आचारसंहिता लागू झाल्यावर हे कॅम्पेन बंद करणे पसंत करतात. यासाठी येणारा खर्च निवडणूक खर्चात दाखवावा लागतो. निवडणुका जवळ आल्या की अनेकजण हे कॅम्पेन राबवितात. हे कॅम्पेन ते सर्व स्तरांवर किंवा आपआपल्या विभागापुरतेच मर्यादित ठेवू शकतात. यासाठी येणारा खर्चही खूप कमी असतो.
लाइक्सपेक्षा वाचकाला खिळवणे महत्त्वाचे
एखाद्या नेत्याच्या फेसबुक पेजला किती लाइक्स आहेत याहीपेक्षा तेथे आलेले वापरकर्ते त्या पेजवर कितीवेळ खिळून राहतात तेथील पोस्टवर किती जण कमेंट्स करतात ही बाब महत्त्वाची ठरत आहे. याचे महत्त्व आता राजकीय नेत्यांनाही कळू लागल्यामुळे त्यांनी यासाठी खासगी कंपन्यांची नेमणूक केल्याचे एका कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader