‘लव्ह जिहाद’ म्हणजे सत्तेवर आल्यानंतरचे अपयश झाकण्याचा नरेंद्र मोदी व भाजपचा प्रयत्न असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार तारिक अन्वर यांनी शनिवारी नागपुरात केली. ‘लव्ह जिहाद’ची सीबीआय चौकशी होत असेल तर ते स्वागतार्ह असल्याचे ते म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक स्वप्ने दाखविली होती. सत्तेत आल्यानंतर महागाईवर भाजपला नियंत्रणही आणता आलेले नाही. भाजपच्या आड संघपरिवारच सत्ता राबवित आहे. वाट्टेल ते करण्यासाठी घटनेशी छेडछाड केली जात असून हिंदू राष्ट्र, लव्ह जिहाद आदी मुद्दे उभे केले जात आहेत.
महागाई, भ्रष्टाचार, काळा पैसा, बेरोजगारी नियंत्रणात आणू न शकणे, हे भाजपचे अपयशच आहे. तेथून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी लव्ह जिहादसारख्या गैरवाजवी बाबींना मुद्दे बनविले जात आहेत. लव्ह जिहाद हा मुळात मुद्दाच नसून तो तापविण्यामागे षड्यंत्र आहे. आंतरधर्मीय प्रेमविवाह करूच नये असा देशात कायदा नाही. भाजपच्या अनेक वरिष्ठ मुस्लीम नेत्यांनी आंतरधर्मीय प्रेमविवाह केलेले आहेत. नरेंद्र मोदी व सत्तारूढ भाजपची दिशाच योग्य नाही.
मोदी सत्तेत आल्यानंतर वाढलेल्या विकासदराकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, हा केवळ ‘मीडिया शायनिंग’चा प्रकार आहे. मुळात देशातील वातावरण बिघडविले जात असल्याने जनतेत असंतोष आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालावरून हे स्पष्ट झाले आहे. अल्पसंख्याकांची मते भाजपकडे गेली, हे म्हणणेही चुकीचे आहे. राकाँ स्वतंत्र पक्ष असून त्याचीही विचारधारा व विशिष्ट स्थान आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग व राकाँचे स्थानिक नेते याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
..म्हणजे काँग्रेसवर दबाव आणणे नव्हे
धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी झाल्यानेच भाजप केंद्रात सत्तेत येऊ शकला. त्यामुळे आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना महायुतीचे आव्हान लक्षात घेता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणूक एकत्र लढावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट मत आहे. २००९ प्रमाणेच लोकसभा निवडणुकीच्या निकालाधारे जागावाटप व्हावे, असेही राकाँला वाटते. जागा वाटप निश्चित होण्याआधीच २८८ जागांसाठी मुलाखती घेणे म्हणजे काँग्रेसवर दबाव आणणे नव्हे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये, असे राकाँला वाटते असे अन्वर यांनी स्पष्ट केले.
हा अपयश झाकण्याचा भाजपचा प्रयत्न
‘लव्ह जिहाद’ म्हणजे सत्तेवर आल्यानंतरचे अपयश झाकण्याचा नरेंद्र मोदी व भाजपचा प्रयत्न असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार तारिक अन्वर यांनी शनिवारी नागपुरात केली.
First published on: 31-08-2014 at 04:03 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tariq anwar slams bjp over love jihad