ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्य़ांमधील शिवसेनेच्या परंपरागत बालेकिल्ल्यांना धडक देत भारतीय जनता पक्षाने २४ पैकी तब्बल नऊ जागांवर विजय मिळवत शिवसेनेला (सात जागा) मोठा धक्का दिला आहे. महायुतीत फाटाफूट झाल्यानंतर या जिल्ह्य़ांमधील अधिकाधिक जागांवर विजय मिळविण्याची रणनीती शिवसेना नेत्यांनी आखली होती. प्रत्यक्षात ठाणे शहरातील बालेकिल्ल्यातच त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. कल्याण, डोंबिवली, मुरबाड या मतदारसंघांत कमळ फुलविताना या सगळ्या पट्टय़ातील शिवसेनेच्या मक्तेदारीला भाजपने मोठे आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे वसई-विरार पट्टय़ात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने तीन जागांवर विजय मिळवत अस्तित्व दाखवून दिले आहे. या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये काँग्रेसला एकही जागाजिंकता आली नसल्याने हे जिल्हे खऱ्या अर्थाने ‘काँग्रेस मुक्त’ झाले आहेत. पालघर मतदारसंघातून निवडणूक लढविणारे काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनाही आपली जागा राखता आलेली नाही. शिवसेनेचे कृष्णा घोडा यांनी त्यांचा अवघ्या ५०० मतांच्या फरकाने पराभव केला. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय केळकर यांनी ७० हजार ८८४ मते मिळवत शिवसेनेचे आयात उमेदवार रवींद्र फाटक यांचा सुमारे १२ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचे पुत्र निरंजन यांना जेमतेम २४ हजार मतांचा पल्ला गाठत आला. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी तसेच ओवळा-माजिवडा मतदारसंघातून शिवसेनेचे एकनाथ िशदे आणि प्रताप सरनाईक यांनी विजय मिळवला असला तरी त्यांनाही भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी कडवी लढत दिली. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांना धडक देताना भाजपने डोंबिवली, कल्याण पश्चिम या मतदारसंघांतही विजय मिळवला. मुरबाडमधून भाजपचे किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीच्या गोटीराम पवार यांच्यावर सुमारे २६ मतांनी विजय मिळवत सलग तीन वेळा निवडून येण्याचा मान मिळवला. मुस्लीमबहुल मतदारसंघ असलेल्या भिवंडी पश्चिमेतून महेश चौगुले यांच्या रूपाने प्रथमच भाजपचे कमळ फुलले आहे. पालघर जिल्ह्य़ात विक्रमगड मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू सवरा विजयी झाले, तर डहाणू या कम्युनिस्टाच्या बालेकिल्ल्यात भाजपचे पालकल धनारे यांनी तब्बल १६७०० मतांनी विजय मिळवत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला.
राष्ट्रवादीला चार जागा
कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे संकटात सापडलेल्या राष्ट्रवादीने ठाणे जिल्ह्य़ातील चार जागांवर विजय मिळवत पक्षाची अब्रू कशीबशी राखली, मात्र पालघर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीला साधे खातेही उघडता आले नाही. एमआयएम पक्षाच्या उमेदवारामुळे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कळवा-मुंब्रा मतदारसंघातील लढत राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एकतर्फी जिंकली. मुंब््रयापाठोपाठ कळव्यातही आव्हाड यांनी मोठे मताधिक्य घेतले. उल्हासनगरमधील प्रतिष्ठेच्या ठरलेल्या लढाईत पप्पू कलानी यांच्या पत्नी ज्योती यांनी भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांचा पाडाव केला. शहापूर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार दौलत दरोडा यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. राष्ट्रवादीचे पाडुरंग बरोरा यांनी त्यांचा पराभव केला. वसई-विरार-बोईसर पट्टय़ातील तीन जागांवर हितेंद्र ठाकूर यांचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत, तर मीरा-भाईंदर मतदारसंघात भाजपच्या नरेंद्र मेहता यांनी राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेन्डोन्सा यांचा मोठय़ा मताधिक्याने पराभव केला. पालघर जिल्ह्य़ातील सर्वात मोठा पक्ष म्हणून बहुजन विकास आघाडीचा उदय झाला आहे.
ठाणे, पालघरवर भाजपचे वर्चस्व
ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्य़ांमधील शिवसेनेच्या परंपरागत बालेकिल्ल्यांना धडक देत भारतीय जनता पक्षाने २४ पैकी तब्बल नऊ जागांवर विजय मिळवत शिवसेनेला (सात जागा) मोठा धक्का दिला आहे. महायुतीत फाटाफूट झाल्यानंतर या जिल्ह्य़ांमधील अधिकाधिक जागांवर विजय मिळविण्याची रणनीती शिवसेना नेत्यांनी …
First published on: 20-10-2014 at 04:41 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane palghar verdict in bjp favour