लोकसभा निवडणुकीनंतर बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे तासगाव तालुक्यामध्ये मतदारांना अष्टविनायकाच्या मोफत दर्शनानंतर मनपसंत जेवणावळीचा आस्वाद मिळतो आहे. आचारसंहितेच्या कचाटय़ात सापडायला नको म्हणून या जेवणावळीसाठी होऊन गेलेल्या वाढदिवसाचे कारण पुढे करून राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तासगाव कवठे महांकाळ मतदार संघात भारतीय जनता पक्षाने लक्ष केंद्रित केले असून पारंपरिक विरोधक असणारे खासदार संजयकाका पाटील आणि गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यातील संघर्ष पक्षीय पातळीवरून वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. अजित घोरपडे हे आबांना भाजपाच्या माध्यमातून आव्हान देण्याच्या तयारीत असून प्रचाराचा प्रारंभसुद्धा केला आहे.
या वेळी असलेले तगडे आव्हान वेळीच ओळखून आबांनीसुद्धा यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मंत्रिपदाचा संपर्कात येणारा अडथळा दूर सारून आबा आता सामान्य लोकांत मिसळून जुन्या ओळखींना उजाळा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मंत्री पदामुळे निर्माण झालेला दुरावा दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असून त्यासाठी कोणाच्याही वाढदिवसाचे कारण पुरेसे ठरत आहे.
एखाद्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस झालेला असला, तरी याच वाढदिवसाच्या निमित्ताने जेवणावळीचे आमंत्रण सामान्य माणसाला आावर्जून दिले जात असून आबांच्या पंक्तीचा लाभ असल्याचे आवर्जून सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत जनमताचा कौल आघाडीविरुद्ध गेल्यामुळे आबाही अत्यंत सावध झाले असून गावपातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास अग्रक्रम देत आहेत. गावपातळीवरील कोणत्याही कार्यक्रमाचे आमंत्रण आले, तर आतापर्यंत ‘नॉट रिचेबल’ असणारे आबा आता हाक मारताच सामान्य कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाचे घरचे कार्य समजून हजेरी लावत आहेत.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा