केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्यास अडथळ्याविना विकास होऊ शकतो, असा युक्तिवाद भाजपकडून करण्यात येतो. मात्र, गेल्या १५ वर्षांत केंद्रात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असूनही भ्रष्टाचाराशिवाय फार काही हाती लागले नाही. याउलट गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजपचे सरकार असतानाच राज्याचा वेगाने विकास झाला. त्यामुळे केंद्रात कुणाचे सरकार आहे, यापेक्षा राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे, ही गोष्ट महत्त्वाची असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी जळगाव येथील प्रचारसभेत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली. याशिवाय, भाजपने प्रचारादरम्यान, केवळ सोयीस्कररित्या शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केल्याचा आरोप उद्धव यांनी केला. शेवटच्या क्षणापर्यंत आपण युती टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, युतीत शिवसेनेला मित्राऐवजी गुलामाची वागणूक देण्याच्या भाजपच्या भूमिकेमुळे आपला नाईलाज झाल्याचे त्यांनी सांगितले.    

Story img Loader