गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेना-भाजपच्या सहा जागा आपल्याकडे खेचणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत आपले खातेही उघडता आलेले नाही. तीच गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची झाली असून गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून मिळविलेल्या तीन जागा या पक्षाला पुन्हा राखता आलेल्या नाहीत. त्याच वेळी मुंबईत बहुतांश भाजप उमेदवारांनी विजय मिळविताना मतांची मोठी आघाडी घेतली असून त्यांचे पराभव मात्र अगदी थोडक्या मतांनी झाले आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून मनसेचे सहा तर राष्ट्रवादीचे तीन आमदार निवडून आले होते. या सर्वाना या निवडणुकीत मतदारांनी धूळ चारली. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, मंगेश सांगळे, प्रवीण दरेकर या मनसेच्या विद्यमान आमदारांना पराभव पत्करावा लागला. राम कदम मात्र भाजपच्या तिकिटावर निवडून आले. राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्यासह प्रवक्ते नवाब मलिक, मिलिंद कांबळे यांनाही मतदारांनी धूळ चारली आहे.
अहिर यांना वरळी मतदारसंघातून सेनेच्या सुनील शिंदे यांच्याकडून २३ हजार १२ मतांनी पराभव पत्करावा लागला. त्याचवेळी सेनेच्या तुकाराम काते यांनी मलिक यांच्यावर मानखुर्द-अणुशक्ती नगरमधून एक हजार सात मतांनी विजय मिळविला. कुल्र्यात मिलिंद कांबळे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. सेनेचे मंगेश कुडाळकर यांनी भाजपच्या विजय कांबळे यांचा पराभव केला.
शिवडीत बाळा नांदगावकर यांचा सेनेच्या अजय चौधरी यांनी तब्बल ४१,९०९ मतांनी दणदणीत पराभव केला. माहिममध्ये सेनेच्या सदा सरवणकर यांनी नितीन सरदेसाई यांचा ५,९४१ मतांनी पराभव केला. मागठाणे मतदारसंघात दरेकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. सेनेचे प्रकाश सुर्वे यांनी भाजपच्या हेमेंद्र मेहता यांचा २०,३८५ मतांनी पराभव केला. भांडूप पश्चिम मतदारसंघातही सेनेचे अशोक पाटील यांनी भाजपच्या मनोज कोटक यांचा पराभव करताना मनसेच्या शिशिर शिंदे यांना तिसऱ्या क्रमांकावर फेकले. विक्रोळीत मंगेश सांगळे यांचा सेनेच्या सुनील राऊत यांनी २५,३३९ मतांनी पराभव केला. मनसेतून भाजपमध्ये गेलेले राम कदम हे मोठय़ा मताधिक्याने निवडून आले. सेनेच्या सुधीर मोरे यांचा त्यांनी ४१,९१६ मतांनी पराभव केला.
बेहिशेबी मालमत्तेमुळे वादग्रस्त ठरलेले काँग्रेसचे माजी आमदार कृपाशंकर सिंग यांनाही मतदारांनी नाकारले. या मतदारसंघात सेनेचे संजय पोतनीस यांनी भाजपच्या अमरजित सिंग यांचा १२९७ मतांनी पराभव केला. वांद्रे पश्चिम मतदारसंघात मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांनी बाबा सिद्दिकी यांचा २६,९११ मतांनी तर अंधेरी पश्चिममध्ये भाजपच्या अमित साटम यांनी अशोक जाधव यांना धूळ चारली. विलेपार्ले येथे अॅड. पराग अळवणी विजयी झाले. कृष्णा हेगडे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. काँग्रेसचे अस्लम शेख हे मालाडमधून विजयी झाले.
माजी महापौर सुनील प्रभू हे दिंडोशीतून विजयी झाले. गोरेगावात मात्र सेनानेते सुभाष देसाई यांना भाजपच्या विद्या ठाकूर यांच्याकडून ४,७५६ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेचे विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांनी जागेश्वरी पूर्वेतून भाजपच्या उज्ज्वला मोडक यांचा पराभव करताना २८,९६२ मताधिक्य मिळविले. मुलुंडमध्ये भाजपच्या सरदार तारासिंग यांनी ६५,३०७ तर घाटकोपर पूर्वेत भाजपच्या प्रकाश मेहता यांनी ४०,१२७ असे दणदणीत मताधिक्य मिळविले. मलबार हिलची जागा मंगलप्रभात लोढा यांनी तब्बल ६८,६८६ मतांनी राखली. कांदिवली पूर्वेत अतुल भातखळकर यांनी रमेशसिंग ठाकूर यांचा ४१,१८८ मतांनी पराभव केला. दहिसरमध्ये भाजपच्या मनिषा चौधरी यांनी सेनेच्या विनोद घोसाळकर यांना ३८,५७८ मतांनी हरविले.
विनोद तावडेंचे मुंबईत सर्वाधिक मताधिक्य!
मुंबईतून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी पटकावला. तब्बल ७९,२६७ इतक्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्याखालोखाल चारकोप येथे भाजपच्या योगेश सागर यांचा क्रमांक लागतो. सेनेच्या शुभदा गुडेकर यांचा त्यांनी ६४,३६७ मतांनी पराभव केला.
अखंड महाराष्ट्राचे वचन घेऊन शिवसेनेकडे कुणी आल्यास सरकार स्थापण्यास पाठिंबा देऊ शकतो. माझ्याकडे अद्याप कुणी आलेले नाही आणि शिवसेना कुणाकडे जाणार नाही – उद्धव ठाकरे, शिवसेना प्रमुख
लक्षवेधी निकाल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा