मातोश्रीवरील आदेशानंतर शिवसेनेच्या रडारवर आलेले जळगावच्या मुक्ताईनगर मतदार संघातील भाजपचे उमेदवार ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पराभूत करण्याचे डावपेच आखण्यास वेगाने सुरुवात झाली आहे. खडसेंच्या बालेकिल्ल्यास भगदाड पाडण्यासाठी सेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ थेट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा घेण्याचे नियोजन केले जात आहे. बहुरंगी लढतीत मराठा व दलित समाजातील मतांचे होणारे विभाजन खडसेंच्या पथ्यावर पडणारे असले तरी नेहमीप्रमाणे त्यांना एकतर्फी किल्ला सर करणे सोपे नाही. भाजपचे प्राबल्य असणाऱ्या जळगाव जिल्ह्यात शिवसेना वरचढ ठरणार नाही, याची पदोपदी दक्षता खडसेंनी घेतल्याचे सांगितले जाते. सेना-भाजपच्या ताटातुटीमुळे गत काही वर्षांत धुमसणारा असंतोष या निमित्ताने बाहेर पडू शकतो. तसेच भाजपमधील अंतर्गत सुप्त कलह सेनेला ऐनवेळी रसद पुरविण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुक्ताईनगरसह रावेर व बोदवड तालुक्यातील काही गावे समाविष्ट असणाऱ्या या मतदारसंघावर १९९० पासून खडसे यांचे वर्चस्व आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारास पराभूत केले. पण, त्यांचे मताधिक्य कमी होऊन १८ हजारावर आले होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत या मतदारसंघात भाजप उमेदवारास केवळ १३ हजार ७८० मतांचे मताधिक्य मिळाले.
बहुतांश मतदारसंघात भाजप उमेदवारास विक्रमी मताधिक्य मिळाले असताना तुलनेत मुक्ताईनगर त्यास काहिसा अपवाद ठरला. या एकूणच परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत खडसे यांच्या विरोधात सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात खडसे आणि घरकूल घोटाळ्यात तुरुंगवासी झालेले शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. जैन तुरुंगात असल्याने खडसेंच्या विरोधात ते फारसे काही करू शकणार नाहीत. परंतु, सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विविध समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. भाजपमधील सुप्त संघर्षांचा लाभ उचलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मतदारसंघात एकूण १८ उमेदवार रिंगणात असून त्यात राष्ट्रवादीचे अरुण पाटील व काँग्रेसचे योगेंद्र पाटील यांचाही समावेश आहे. या भागात मराठा, लेवा पाटील समाजाचे प्राबल्य आहे. मराठा समाजाचे दोन तर दलित समाजाचे चार उमेदवार असल्याने या मतांची फाटाफूट होईल. ही बाब भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे. दुसरीकडे हे विभाजन टाळण्याची व्यूहरचना सेनेच्या गोटातून केली जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना सेनेने मुक्ताईनगरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत खडसेंना ही निवडणूक सोपी नाही हे दर्शविण्याचा प्रयत्न केला. आता सेनेच्या प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभांचा धडाका लावून खडसेंची कोंडी करण्याचे निकराचे प्रयत्न केले जात आहेत.
एकनाथ खडसेंसाठी विजय आव्हानात्मक
मातोश्रीवरील आदेशानंतर शिवसेनेच्या रडारवर आलेले जळगावच्या मुक्ताईनगर मतदार संघातील भाजपचे उमेदवार ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पराभूत करण्याचे डावपेच आखण्यास वेगाने सुरुवात झाली आहे.
First published on: 03-10-2014 at 03:24 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Victory difficult for eknath khadse