राज्यात भाजपला मिळालेल्या यशानंतर मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेले वाद-प्रवाद शमत असतानाच सत्तास्थापनेची तयारी जोमात सुरू झाली आहे. मात्र, विदर्भातील काही आमदारांना ना या बैठकीची सूचना, ना घडत असलेल्या घडामोडींची माहिती दिली जात असल्यामुळे मुंबईला जावे की नाही, याबाबत जिल्ह्य़ातील आमदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून पक्षात गेल्या आठ दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता असून शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. भाऊबीज आटोपल्यावर सर्व आमदारांना मुंबईला बैठकीसाठी बोलविण्यात येण्याची शक्यता होती. मात्र, विदर्भातील बहुतेक आमदारांना अजूनही बैठकीचे निमंत्रण मिळालेले नाही. मुंबईत राजकीय घडामंोडींना वेग येत असताना विदर्भातील आमदार मात्र पक्षश्रेष्ठींकडून येणाऱ्या निरोपाची वाट पहात आहेत. शुक्रवारी रात्री प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी, तर शनिवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना गती आली असली तरी अनेक नवनिर्वाचित आमदारांना मात्र सध्या त्याबाबत काहीच माहिती नाही. अनेक आमदार मंत्रिपदासाठी लॉबिंग करण्यास्तव पक्षश्रेष्ठींमागे लागल्याचे चित्र आहे. या संदर्भात आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, अजूनही बैठकीची कुठलीही सूचना नाही. शपथविधी सोहळा ३० तारखेला आहे आणि त्यासाठी स्थान निश्चित केल्याचे प्रसार माध्यमातूनच कळले. मात्र, प्रत्यक्षात पक्षश्रेष्ठींकडून याबाबत कुठलीही सूचना नाही. बैठकीची सूचना आल्यावर मुंबईला जाऊ.
आमदार सुधाकरराव देशमुख म्हणाले, राज्यात सरकार भाजपचे सरकार येणार असले तरी बैठकीसंदर्भात अजून कुठलेच आदेश आलेले नाहीत. उद्या काही आमदार मुंबईला जाणार आहेत. मात्र, सर्व आमदारांची बैठक २८ किंवा २९ होण्याची शक्यता आहे आणि त्याप्रमाणे त्यांना मुंबईला येण्यासंदर्भात निरोप जातील.