निवडणुकीपूर्वी राजकीय सोईनुसार वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश करत जिल्ह्यातील माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित कुटूंबियांनी चारपैकी तीन मतदार संघांवर दावा केला खरा, परंतु आघाडी आणि युतीमध्ये जागावाटपाच्या मुद्यावरून उठलेले वादळ या कुटूंबाभोवती चांगलेच घोंघावले आहे.
नंदुरबारच्या राजकारणात आपला दबदबा निर्मान करणाऱ्या डॉ. विजयकुमार गावित यांनी सोईंनुसार आपल्या भावांचेही राजकीय पुनर्वसन केले. नवापूर मतदार संघातून धाकटे बंधु शरद गावित यांना समाजवादी पक्षाच्या तिकीटावर मागील निवडणुकीत निवडून आणल्याने त्यांच्या इतर भावांच्याही राजकीय अपेक्षा उंचावल्या. त्यामुळे डॉ. गावित यांचे दोन नंबरचे भाऊ राजेंद्र गावित युती होईलच या विश्वासाने शहादा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याच्या इच्छेने शिवसेनेत आले. दुसरीकडे शरद गावित यांनीही राजकीय हवा पाहून निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत काँग्रेसचा गड असलेल्या नवापूर मतदार संघावर दावा केला.
युती आणि आघाडी यांच्यात होणाऱ्या वाटाघाटीत हे मतदारसंघ आपण प्रवेश केलेल्या पक्षालाच सुटतील अशी गावित भावंडांची राजकीय अपेक्षा होती. परंतु युती आणि आघाडीतील राजकारणामुळे गावित कुटूंबियांची राजकीय खेळी आता त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत नवापूरमधून सुरूपसिंग नाईक यांचा समावेश असल्याने शरद गावित यांची चांगलीच राजकीय अडचण झाली आहे.
दुसरीकडे शहाद्यातून शिवसेनेकडून उमेदवारीसाठी दावेदारी करणारे डॉ. गावित यांचे बंधु राजेंद्र गावितही वादामुळे पेचात सापडले आहेत. क्रीडा मंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी यांना कडवी झूंज देण्यासाठी महायुतीचे पाठबळ आवश्यक असताना भाजपकडून उद्देसिंग पाडवी यांनीही येथे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. युती तुटल्याने भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. गावित आणि त्यांच्या कंन्या खासदार हीना गावित सेनेच्या राजेद्र गावित यांचा प्रचार तरी कसा करणार, ही गावित कुटूंबियांची अडचण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijaykumar gavit in family controversy